सीसीटीव्ही बसविण्याची मागणी ऐरणीवर
नागरिकांकडून पोलिसांची तत्परता बेदखल
भिगवण शहराला सीसीटीव्हीची गरज असून याकडे गावकारभारी गांभीर्याने पाहताना दिसून येत नाहीत. त्यामुळे गावात अनेक ठिकाणी चोऱ्या होत आहेत. इतरही गुन्हे होताना दिसत आहे. पोलीस अधिकारी ढवान यांनी काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही मोहीम राबविण्यासाठी स्वत:चे 50 हजार रुपये देण्याची तयारी दाखविली होती. मात्र, गावकारभारी आणि व्यापाऱ्यांनी यात अनास्था दाखविल्यामुळे पोलिसांनी चोरी झाल्यावर पंचनामा आणि तपास या कामाकडेच आपले लक्ष केंद्रित केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.
भिगवण – भिगवण पोलीस ठाण्यापासून 500 मीटर अंतरावर असणाऱ्या कृष्णकुंज इमारतीत सुधीर पालकर यांच्या घरात चोरट्यांनी 17 तोळे सोने आणि 80 हजार रुपये रोकड, असा 4 लाख 20 हजार रुपयांचा ऐवज लुटला. या घटनेमुळे भिगवण परिसरात घबराट पसरली आहे. पोलीस अधिकारी महेश ढवाण यांनी स्व:खर्चातून 50 हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, हा विषय बारगळा आहे. त्यामुळे चोरीचे सत्र थांबता थांबेना, अशी स्थिती समोर आली आहे. या चोरीसत्रांमुळे सीसीटीव्ही बसविण्याचा विषय ऐरणीवर आला आहे.
भिगवण परिसरात भरदिवसा चोऱ्या करीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बुधवारी एकाच दिवसात नऊ ठिकाणी घराचे दरवाजे तोडून 6 लाखांवर ऐवज लुटला होता. अपार्टमेंटमधील बंद दरवाजा चोरट्यांसाठी संधी ठरत आहे. भिगवण हे गाव शहरीकरणाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करीत आहे. अपार्टमेंट संस्कृती वाढू लागली आहे.त्यामुळे काही कामानिमित घरातील सदस्य बाहेर पडताना घराला कुलूप लावून बाहेर जाताच चोरटे आपला हात साफ करत आहेत. पोलीस ठाण्यापासून 500 मीटर अंतरावर असणाऱ्या इमारतीत चोरी होत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह दाटून आले आहेत. मागील महिनाभरात भरदिवसा चोरट्यांनी चोरीचा सपाटा लावल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील. नागरिकांनी सतर्क राहाव, असे भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश ढवान यांनी आवाहन केले.