तासगाव : तालुक्यातील बस्तवडे येथे डोंगराला सुरुंग लावून सपाटीकरण करत असताना जिलेटीनच्या कांड्या ठेवलेल्या गाडीच्या कॉम्प्रेसर, गॅस सिलेंडर आणि डिझेल टाकीचा स्फोट झाल्याने रविवारी दोघे ठार झाले.कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशीचे आदेश दिले. 24 तास उलटूनही पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
हा डोंगर यूएसके ऍग्रोचे संभाजी चव्हाण व अन्य तिघांनी विकत घेतला आहे.तेथे डोंगराचे सपाटीकरण करून जमीन तयार करण्याचे काम सुरू आहे. या सपाटीकरणासाठी ब्रेकर, जेसीबी, डंपर, बोअर ब्लास्टिंगच्या मशीनचा वापर करण्यात येत आहे.
हा डोंगर फोडण्यासाठी जिलेटीनसारख्या स्फोटकांचा वापर केला जात होता. बोअर ब्लास्टिंग करून हा डोंगर जमीनदोस्त करण्यात येत होता. रविवारी दुपारी डोंगरात घेतलेल्या बोअरमध्ये जिलेटीनच्या कांड्या घालून स्फोट करण्यात येणार होता. त्यासाठी जिलेटीनच्या कांड्या आणण्यात आल्या होत्या. या कांड्या बोअर ब्लास्टिंगच्या गाडीवर होत्या. मात्र बोअर घेत असताना गाडीचा कॉम्प्रेसर गरम झाल्याने या गाडीचा, डिझेल टाकी व गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटानंतर शेजारी उभा असणाऱ्या दुसऱ्याही गाडीचा स्फोट झाला. या स्फोटात प्रतीक स्वामी व महेश दुडणावार या दोघांचा बळी गेला. तर इश्वर बामणे हा जखमी झाला.
या दुर्घटनेनंतर सोमवारी दुपारी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी घटनास्थळाची पाहणी केली. बॉम्ब स्कॉड पथक व इतर तपास यंत्रणांना याप्रकरणी सखोल तपासाच्या सूचना दिल्या. तपासाधिकारी म्हणून तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांची नियुक्ती करण्यात आली.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी स्फोटकांचे 13 नमुने ताब्यात घेतले आहेत. स्फोट झालेल्या क्षेत्राच्या भोवती पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यावेळी कामगारांचे जबाबही नोंदवण्यात आले. सोमवारी दुपारी विशेष पोलीस महानिरीक्षक लोहिया यांच्यासह पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, तासगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, तहसीलदार कल्पना ढवळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे, सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
दरम्यान, एवढा भीषण स्फोट होऊन 24 तास उलटून गेले तरी अद्याप हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांना करता आला नाही.