सातारा – जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा परिसरात मानवी कवटी आढळल्याचे वृत्त सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. हे वृत्त पूर्णपणे चुकीचे, निराधार व दिशाभूल करणारे असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
याबाबत डॉ. चव्हाण यांनी सांगितले, बुधवार दि.12 जानेवारी 2022 रोजी एक यूट्युबर माझे कार्यालयामध्ये येऊन जिल्हा शासकीय रुग्णालय सातारा परिसरात मानवी कवटी आढळली आहे, असे सांगून त्यांच्या मोबाईलवर त्यांनी मला मानवी कवटीची चित्रफीत दाखवली.
त्यानंतर मी सहकार्यांसह फोरेन्सिक एक्सर्प्ट या बाबीची प्रत्यक्ष शहानिशा करण्यासाठी संबंधित यूट्युबरसोबत पाहणीसाठी गेलो असता त्यांनी आम्हाला सिव्हिल हॉस्पिटल परिसराबाहेर श्री. इंगवले यांचे मटण दुकानाच्या मागील बाजूस नाल्यालगत मानवी कवटी असल्याचे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात पाहणी केल्यावर कोणतीही मानवी कवटी आढळून आली नाही.
सदरची मानवी कवटी ही सिव्हिल हॉस्पिटल साताराच्या आवारात सापडली असे वृत्त हे पूर्णपणे चुकीचे, निराधार व दिशाभूल करणारे आहे. तसेच या घटनेशी सिव्हिल हॉस्पिटल सातारा प्रशासनाचा काहीही संबंध नाही. या गोष्टींमुळे जिल्हा रूग्णालयाची बदनामी झाली असून रूग्णांमध्ये भितीचे वातावरण पसरल्याने या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांना दूरध्वनीद्वारे कळवल्याचे डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.