स्वायत्त संस्थांवर भाजपकडून आक्रमण

श्रीमंत कोकाटे यांचा आरोप : साताऱ्यात खा. उदयनराजेंच्या पाठीशी
सातारा  – सर्वोच्च न्यायालय, सीबीआय, रिझर्व्ह बॅंक अशा स्वायत्त संस्थांवर आक्रमण करण्याचे काम भाजपने केला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली. दरम्यान, देशातील लोकशाही टिकविण्यासाठी पुरोगामी पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यायचे आहे म्हणूनच साताऱ्यात खा. उदयनराजे यांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड ताकदीने उभी राहणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी जोतीराम वाघ, दीपक पाटील, सतीश माने यांच्यासह संभाजी बिर्रगेडचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना कोकाटे म्हणाले, भाजप राजकीय पक्ष नसून एक संप्रदाय आहे. त्यांच्याकडून देशात अघोषित आणीबाणी आणण्याचे काम सुरू आहे, असे मत माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी व्यक्त केले असल्याचा दाखला देवून कोकाटे म्हणाले, आपल्या देशात ग्रामसेवकाच्या देखील बदलीचा आदेश व्हॉटस ऍपवर दिला जात नाही. मात्र, या सरकारने स्वायत्त संस्था असलेल्या सीबीआयच्या संचालकाच्या बदलीचा आदेश मध्यरात्री व्हॉटस ऍपव्दारे पाठविण्यात आला. त्याचबरोबर करण्यात आलेल्या नोटाबंदीमुळे छोट्या व्यावसायिकांचे कसे नुकसान झाले आणि देशाचा विकासदर कमी झाला, याबाबतचे मत खुद्द रिझर्व्ह बॅंकेचे मुख्याधिकारी रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांनी व्यक्त केले आहे.

त्याचबरोबर गुजरात फाईल्स पुस्तकाच्या माध्यमातून मोदी व अमित शहा यांनी घडवून आणलेल्या एन्काऊंटरची माहिती देखील समोर आली आहे. त्याचबरोबर अमित शहा यांना तडीपार देखील करण्यात आले होते. शहा यांचा खटला ज्या न्यायालयात सुरू होता त्या न्यायालयाचे न्यायमूर्ती लोया यांचा घातपात झाला. तसेच दिल्लीमध्ये संविधान जाळण्याची घटना घडली मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. अशीच परिस्थिती राहिली आणि जनता गप्प राहिली तर देशात हुकुमशाही येणार आहे आणि ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेला त्याग देखील वाया जाईल, अशी खंत कोकोटे यांनी व्यक्त केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.