कृषी क्षेत्राशी संबंधित तीन विधेयके सादर

किमान आधारभूत किंमत पद्धत कायम राहणार - तोमर

नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज लोकसभेत कृषी क्षेत्रातील सुधारणांच्या संबंधातील तीन विधेयके सादर केली. ही विधेयके सादर करताना कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, या विधेयकांच्या तरतुदींमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अधिक किंमत मिळेल आणि कृषी क्षेत्रात खासगी गुंतवणूकही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.

मात्र, या विधेयकांमुळे सध्याची किमान आधारभूत किंमत जारी करण्याची पद्धत रद्द होणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कृषी उत्पादन व्यापार व वाणिज्य विधेयक, कृषी माल किंमत आश्‍वासन आणि कृषी सेवा विधेयक आणि जीवनावश्‍यक वस्तू कायदा सुधारणा विधेयक अशा स्वरूपाची तीन विधेयके आहेत.

कृषिमंत्री म्हणाले की, या कायदेशीर तरतुदींनंतर शेतकऱ्यांना कोणत्याही बंधनांशिवाय आपला माल विकता येईल. शेतकऱ्यांना गुंतवणूकदारांशी थेट व्यवहार करण्याचाही अधिकार मिळेल त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. या विधेयकांद्वारे सरकार शेतकऱ्यांसाठीच्या किमान आधारभूत किमतीला तिलांजली देणार असल्याचा समज पसरवला जात आहे; पण त्यात तथ्य नाही. ही पद्धत कायमच राहणार आहे.

बहुतांशी शेतकऱ्यांकडे अगदी अल्प जमीन आहे, त्यांना त्यात पुरेशी गुंतवणूकही मिळत नाही त्यांची ही अडचण दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.