चीनच्या मदतीने कराचीला स्वायत्त प्रांत करण्याचा डाव

लंडन – पाकिस्तानी लष्कर आणि पाक गुप्तहेर संघटना “आयएसआय’ने चीनच्या मदतीने कराचीला फेडरल टेरिटरी घोषित करण्याचा डाव रचला आहे, असा आरोप मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटचे नेते अल्ताफ हुसैन यांनी केला आहे.

लष्कर आणि “आयएसआय’ला मिळणारे स्रोत बळकावण्यासाठी कराचीला स्वतंत्र प्रांत घोषित करण्याचा डाव रचला गेला असून त्यासाठीची योजना पाक लष्कर आणि “आयएसआय’ने पूर्ण केली आहे, असेही हुसैन यांनी म्हटले आहे.

कराचीमध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे शहराची स्वच्छता करण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. ही स्वच्छता करण्यासाठी आपण लष्कराला सूचना केली असल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलिकडेच सांगितले होते. त्या पार्श्‍वभूूमीवर कराचीला स्वतंत्र दर्जा दिला जाणार असल्याची बातमी पुढे आली आहे. स्वच्छता करण्याच्या नावाखाली कराची शहर लष्कराच्या स्वाधीन केले जाणार असल्याचा आरोप हुसैन यांनी केला आहे.

इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील “पीटीआय’ सरकारमधील मंत्री उघडपणे कराची शहरावर केंद्रीय सरकारचा अंकुश असण्याचे समर्थन करणारी वक्‍तव्ये करत आहेत. कराची शहराला अधिक स्वायत्तता, अधिकार आणि सत्ता प्रदान करण्याऐवजी इम्रान खान सरकार कराची शहराचा ताबा केंद्रीय सरकारच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. हे पूर्णतः निषेधार्ह आहे, असे “एमक्‍यूएम’ नेते अल्ताफ हुसैन म्हणाले.

पाकिस्तान लष्कर आणि सरकारचा हा डाव स्थानिक नागरिकांनी हाणून पाडावा, असे आवाहनही हुसैन यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.