नेवासा (गणेश घाडगे) – कुकाणा येथील मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यालय व निवासस्थान असलेल्या जमिनीच्या उतार्यावर खासगी व्यक्तीचे नाव लावून ते हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कागदोपत्री ही प्रक्रिया होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ती थांबविण्याबाबत मुळा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्याने महसूल विभागाला पत्र दिले. तर, याबाबत ग्रामस्थांनी गंभीर आरोप करत जिल्हाधिकार्यांनाही निवेदन दिले आहे.
कुकाणा येथील जंगल रामभाऊ चाकणे यांची 1 हेक्टर 14 आर जमीन मुळा पाटबंधारे विभागाच्या मुळा धरणाच्या कार्यालयीन कामकाजासाठी 1967 मध्ये खरेदी करण्यात आली होती. या जमिनीवर 1975 ते 80 च्या दरम्यान मुळा पाटबंधारे कार्यालय व कर्मचार्यांना राहण्यासाठी निवासस्थाने बांधण्यात आले आहेत. सध्या या ठिकाणी कार्यालय व निवासस्थाने आहेत.
या धरणाच्या पाण्याचे रोटेशनचे कामकाज या ठिकाणहून चालते. परंतु, ही जमीन कूळ कायद्याने प्राप्त असल्याने वर्ग दोनची आहे. त्यामुळे जमिनीवर मूळ मालक जंगले यांचे नाव कब्जेदार रकान्यात आहे. परंतु, अशी परिस्थिती असून, सर्व क्षेत्र मुळा पाटबंधारे विभागाच्या ताब्यात आहे. परंतु, ही जमीन कुळाची असल्याने रमेश रामभाऊ चाकणे व इतरांनी कागदपत्रे तयार केले.
मुळा पाटबंधारे विभागाच्या ताब्यात जमीन असताना परस्पर जमीन नावावर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ राजेंद्र चाबुकस्वार, शिवाजी म्हस्के व इतरांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. त्यात काही खासगी व्यक्तींनी महसूल अधिकारी, कर्मचारी हाताशी धरून हे कृत्य केले आहे.
त्यात स्थळ निरीक्षण न करता आणि सत्य परिस्थिती न पाहता कोणत्या न्यायालयाचा वारसा दाखल न करता वारसा नोंद मुदतीच्या आत मंजूर केली आहे. तसेच साठेखत व इतर विक्री व्यवहार करण्यास संधी दिली आहे. वर्ग दोनचा शेरा देखील आठ दिवसांत कमी केला आहे.
अधिकार्यांनी मिळून हा प्रकार केला असल्याचा आरोप ही निवेदनात करण्यात आला. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. हा प्रकाराबाबत माहिती मिळाल्यानंतर मुळा पाटबंधारे विभागाला जाग आली. या विभागाच्या अधिकार्यांनी जागेची नोंदी व इतर प्रक्रिया थांबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, नेवासा तहसीलदार यांना ही पत्र दिले आहे.
जमिनीचे वर्ग एकमध्ये रुपांतरित
रमेश जंगले चाकणे व इतर दोघांनी जमिनीच्या आकाराचे 40 पट रक्कम सरकारी खजिन्यात आठ दिवसांत भरले आहेत. जमीन वर्ग दोनमधून एकमध्येे रुपांतरित करण्यात आली आहे.
मुळा पाटबंधारे विभागाची कुकाणा येथील जमिनीची परस्पर खरेदी होत असल्याचे उघडकीस आले आहे. ही प्रक्रिया थांबविण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय व नेवासा तहसीलदारांना पत्र दिले आहे.
सायली पाटील
अतिरिक्त उपकार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग.