मुलाखतींच्या निमित्ताने बालेकिल्ल्याची डागडुजी

अजित पवारांच्या कार्यशैलीकडे लक्ष : पाच वर्षांत मोठी पडझड

सातारा – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इच्छूक उमेदवारांच्या गुरुवार दि.25 रोजी मुलाखती होणार आहेत. विशेष बाब म्हणजे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुलाखती होणार आहेत. वास्तविक मुलाखती निमित्त मात्र असून मागील पाच वर्षांत आणि झालेल्या लोकसभा निवडणुकीत बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळले आहेत. त्यामुळे स्वाभाविक मुलाखतीच्या निमित्ताने बालेकिल्ल्याची डागडुजी करण्याचा प्रयत्न होणार आहे. डागडुजी करताना धाकटे पवार नेमकी कोणती कार्यशैली वापरतात हे पाहणे औत्सुक्‍याचे राहणार आहे.

राजेंच्या उपस्थितीकडे लक्ष
लोकसभा निवडणुकीनंतर खा. उदयनराजे विरुद्ध आ. शिवेंद्रसिंहराजे व ना. रामराजे संघर्षाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मात्र, तरीही फलटणमधून ना. रामराजे नाईक निंबाळकर यांचे समर्थक आमदार दीपक चव्हाण यांनी तिसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. तर दुसऱ्या बाजूला आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलेला नव्हता. त्याचबरोबर नुकतेच सातारा दौऱ्यावर आलेले खा. शरद पवार यांची ही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी भेट घेतली नव्हती. पार्श्‍वभूमीवर आ. शिवेंद्रसिंहराजे आ. अजित पवार यांच्या उपस्थितीत मुलाखतीला उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

संघटन पुनर्बांधणीचे आव्हान
राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्ष केंद्रात आणि राज्यात सलग 15 वर्षे सत्तेत राहिला. 15 वर्षांच्या कालावधीत सत्तेच्या जोरावर अनेक पदाधिकारी मोठे झाले. काहींनी संघटन वाढीसाठी प्रयत्न केले. मात्र, मागील 5 वर्षांत सत्तेपासून दूर राहिल्यामुळे लाभार्थी पक्ष सोडून गेले. त्यामुळे संघटन वाढ होणे दूरच उलट शिल्लक कार्यकर्त्यांमध्ये मरगळ निर्माण झाली आहे. त्यामुळे संघटन पुनर्बांधणीसाठी नेमके काय करावे लागणार, या मुद्द्यावर देखील पवार पदाधिकाऱ्यांशी चर्चा करताना दिसून येतील.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)