नगर – राष्ट्रवादीपाठोपाठ आता कॉंग्रेसने देखील विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून येत्या 29 जुलै रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली. चौथा मजला, कालिका प्राईड, पाठक हॉस्पिटल शेजारी, लालटाकी, नगर येथे मुलाखती होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यपातळीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस व समविचारी पक्षांची आघाडी होण्याबाबत विविध चर्चा व बैठक सुरु असून सदर जागा वाटपाचा अंतिम निर्णय झाल्यानंतरच मतदारसंघ निश्चित होणार आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने प्रदेश कॉंग्रेसच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील विधानसभा स्तरावरील उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे.
मुलाखतींसाठी प्रदेश कॉंग्रेसचे निरीक्षक म्हणून पुणे येथील माजी आमदार मोहन जोशी, धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी बापू दहिते उपस्थित राहणार आहेत. मुलाखतींसाठी दक्षिणतील मतदारसंघासाठी सकाळी 11 ते 12.30 तर उत्तर जिल्ह्यातील मतदारसंघासाठी दुपारी 12.30 ची वेळ निश्चित करण्यात आली आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.