पुणे -आठ विधानसभा मतदार संघांसाठी भाजपकडून 103 इच्छुकांनी मुलाखती दिल्या खऱ्या, परंतु मुलाखतीत “उरकणे’ हा प्रकार केल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी भाजपतर्फे गुरूवारी 103 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. निरीक्षक आणि आमदार आशिष शेलार यांनी या मुलाखती घेतल्या. मात्र, सकाळी 11 वाजता ठरवलेल्या मुलाखती दुपारी 2 वाजता सुरू झाल्या. 103 जणांच्या मुलाखती दीड ते दोन तासांमध्ये उरकण्यात आल्या. काही इच्छुकांना तर केवळ नावेच विचारली, बाकी काहीच कार्याविषयी विचारणा करण्यात आली नसल्याची खंत काही इच्छुकांनी व्यक्त केली. त्यामुळे या मुलाखती हा केवळ एक समजुतीचा कार्यक्रम असल्याची चर्चा शहरात होती. मुलाखतीच्या वेळी इच्छुकांचे कार्यअहवाल घेण्यात आले.
प्रत्येक मतदारसंघनिहाय या मुलाखती घेण्यात आल्या. एका इच्छुकाच्या सांगण्यानुसार, मुलाखतींच्या वेळी केवळ नाव विचारण्यात आले. यावेळी कामाचा आढावा म्हणून कार्यअहवाल घेण्यात आले. काही मिनिटांमध्ये एका मतदारसंघाच्या मुलाखती पार पाडल्या. पुण्याचे निरीक्षक आशिष शेलार यांनी याअगोदर काही प्रमुख उमेदवारांशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.