पुणे पालिकेत कालबाह्य अग्निशमन यंत्रणा

पुणे – महापालिकेच्या मुख्य इमारतींमध्ये तातडीची उपाययोजना म्हणून बसविण्यात आलेले अग्निशमन प्रतिबंधात्मक यंत्रणा (फायर एश्‍टिंयुविशर) कालबाह्य झाले असल्याची बाब समोर आली आहे. दरम्यान, एखादी दुर्घटना घडल्यास ही यंत्रणा कुचकामी ठरून जीवित तसेच वित्तहानी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तातडीने ही यंत्रणा बदलण्यात यावी, अशी मागणी सिटीआय संस्थेचे संजय शितोळे यांनी आयुक्‍तांकडे पत्राद्वारे केली आहे.

महापालिकेच्या प्रत्येक मजल्यावर आगीची दुर्घटना घडल्यास प्राथमिक उपाय म्हणून ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. फायर एश्‍टिंयुविशरमध्ये वापरले जाणारे साहित्य ठराविक कालावधीनंतर बदलणे आवश्‍यक आहे. मात्र, महापालिकेच्या मुख्य इमारतीत असलेले फायर एश्‍टिंयुविशर 2011 मध्ये बसविण्यात आले आहेत. हीबाब लक्षात आल्यानंतर शितोळे यांनी पालिकेच्या सुरक्षा विभागाच्या निर्दशनास ही बाब आणून दिली. त्यानंतर सुरक्षा विभागाने हात झटकत ही अग्निशमनदलाची जबाबदारी असल्याचे सांगितले. तर अग्निशमनदलाकडून हे भवन विभाग अथवा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे काम असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोणीही या प्रकाराची जबाबदारी घेण्यास तयार नसले तरी, आगीची एखादी गंभीर घटना घडल्यास मोठी जीवित तसेच वित्तहानी होणार आहे. त्यामुळे याप्रकरणी तातडीने लक्ष देण्याची मागणी शितोळे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.