अन्वयार्थ : कलाकारांची राजकीय इनिंग

प्रसाद पाटील

राजकारणाच्या क्षेत्रात अभिनय करावाच लागतो, असं उपहासानं म्हटलं जात असलं आणि काही वेळा ते प्रत्यक्षातही दिसत असलं तरी राजकारण आणि सिनेमा ही दोन्ही क्षेत्रं पूर्णतः भिन्न आहेत. राजकारणातलं कुणी आमदारकी-खासदारकी सोडून नाट्य अथवा सिने-मालिकांच्या क्षेत्रात आल्याचं ऐकिवात नसलं तरी सिनेक्षेत्रात दबदबा निर्माण करणाऱ्या अनेकांनी राजकारणात येऊन बस्तान बसवण्याचा प्रयत्न केला आहे. काहींचा प्रयत्न यशस्वी झाला तर काहींचा फसला! पण तरीही ही परंपरा मात्र खंडित झाली नाही, हे उर्मिला मातोंडकरच्या उमेदवारीवरून दिसून येत आहे.

सलमान खान बरोबर “बागी’ हा चित्रपट यशस्वी झाल्यानंतर दिल्लीत आलेल्या नगमाने अनौपचारिक संवादात असे म्हटले होते की, तिला राजकारणात काहीच रस नाही आणि राजकीय चर्चांमुळे तिचे डोके दुखते. हिंदी चित्रपटात तिचे बस्तान न बसल्याने तिने दक्षिण आणि भोजपुरी चित्रपटसृृष्टीत हातपाय मारले आणि आपल्या करिअरची नाव बुडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फारसा लाभ झाला नाही. अखेर थकून तिने राजकारणातच उडी घेतली. 2009 मध्ये तिला निवडणुकीचे तिकीटही मिळाले असते, पण कॉंग्रेसने मात्र तिच्या ग्लॅमरचा वापर करून घेण्यासाठी निवडणूक प्रचारातच तिला गुंगवले. गतवेळच्या म्हणजे 2014 मध्ये तिला निवडणुकीच्या मैदानात उतरवले.

उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमधून नगमाला तिकीट हवे होते. एकेकाळी भोजपुरी सिनेमातील सुपरस्टारची इमेज तिला निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी हात देईल असा तिचा कयास होता. पण कॉंग्रेसने मुरादाबादची जागा क्रिकेटपटू मोहम्मद कैफच्या झोळीत टाकली आणि नगमाला मेरठमधून उभे केले. नवी जागा, नवे लोक त्यातही आपली चित्रपटातील ओळख वापरून मतदारांना आकृष्ट करणे सोपे असले तरी त्यांची मते मिळवणे सोपे नसल्यामुळे साहाजिकच तिचा पराभव झाला. चित्रपटाचे ग्लॅमर तिच्या उपयोगी आले. रस्ता, गल्ली बोळ इथे नगमा आली म्हणता लोक उत्साहाने तिला पाहायला यायचे. पण बाहेरचा उमेदवार म्हणून तिला विरोध सहन करावा लागलाच.

जयाप्रदा ः अशीच कहाणी आहे जयाप्रदांची. आजम खान यांच्या विरोधाला न जुमानता समाजवादी पक्षाच्या तिकिटावर रामपूरमधून 2004 आणि 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक जिंकलेल्या जयाप्रदा 2014 मध्ये कॉंग्रेसच्या गोटात गेल्या. त्या मुरादाबादेतून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या. त्यापूर्वी चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगु देसम पक्षातही तिने चाचपणी केली होती. जयाप्रदा आणि त्यांचे राजकीय संरक्षक अमरसिंह यांना आपला सहकारी पक्ष असणाऱ्या राष्ट्रीय लोकदलामध्ये शिरकाव करून दिला. यावेळी त्या भाजपकडून रामपूरमध्ये उमेदवार आहेत.

हेमामालिनी ः निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये भाजपचा प्रचार करताना शोलेतील बसंतीचे डायलॉग ऐकवून गर्दीचे मनोरंजन करणाऱ्या “ड्रीम गर्ल’ हेमामालिनी यांना त्यांच्या सेवेचे फळ म्हणून राज्यसभेचे सदस्यत्व मिळाले. पण त्यांची महत्त्वाकांक्षा होती ती लोकसभेत पोहोचण्याची. पण त्याच कामाच्या आधारे त्या यंदा पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरल्या आहेत.

राज बब्बर ः मुंबईत बारा रुपयात एका व्यक्तीला जेवण उपलब्ध करून देण्याच्या बाता मारून देशभरात चर्चेत येण्याचा प्रयत्न करणारे राज बब्बर आगऱ्यापासून फतेहपूर सीकरी ते 2014 मध्ये गाजियाबाद जागेवर पोहोचले. गेल्या पंधरा वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांची राजकीय निष्ठा बदलत राहिली आहे. दोन वेळा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर आगऱ्यातून संसदेवर निवडून गेलेल्या राज बब्बर यांना कॉंग्रेसच्या तिकिटावर 2009 मध्ये फतेहपूर सीकरीमधून निवडणूक लढवणे महागात पडले. पण फिरोजाबादच्या जागेवर फेरनिवडणूक झाली आणि राज बब्बर यांनी अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव याचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला. पण 2014 मध्ये त्यांना गाजियाबादमध्ये पराभव पत्करावा लागला. आता पुन्हा फतेहपूर सीकरीमधून ते निवडणूक लढवत आहेत. राज बब्बरप्रमाणे शॉटगन नावाने प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा यांचाही राजकीय प्रवास मोठा रंजक राहिला आहे. ते दोन वेळा राज्यसभेचे सदस्य होते. 1999 मध्ये जेव्हा भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार बनले तेव्हा शत्रुघ्न सिन्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री होते. पण मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांचे बिनसले. आता त्यांची बडबड भाजपला डोकेदुखी झाली आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यास विरोध असलेल्या विरोधकांमध्ये शत्रुघ्न सिन्हा सर्वात अग्रणी होते. असे असूनही 2014 मध्ये पुन्हा बिहारच्या पटना साहिबमधून त्यांना लोकसभेचे तिकीट दिले होते. आता ते काळजावर दगड ठेवून भाजपामधून बाहेर पडत कॉंग्रेसवासी झाले आहेत.

विनोद खन्ना ः खलनायकापासून नायक झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांच्याप्रमाणेच विनोद खन्ना यांनीही आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपमधूनच केली होती. ते 1997 मध्ये भाजपमध्ये गेले आणि तीन वेळा पंजाबमधील गुरूदासपूरमधून लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. एनडीए सरकारमध्ये पर्यटन आणि परराष्ट्र मंत्रालयात राज्यमंत्र्यांची जबाबदारी विनोद खन्नांनी सांभाळली होती. भाजपने 2014 मध्ये गुरूदासपूरमधून पुन्हा एकदा विनोद खन्नांवर बाजी लावायची ठरवली. त्यात यशही मिळाले.

सुनिल दत्त ः बॉलीवूडमधून “पॉलीवूड’मध्ये आलेल्या चित्रपट कलाकारांपैकी राजकारणात सर्वाधिक काळ काढला तो सुनील दत्त यांनी. मुंबई ते अमृतसरच्या सुवर्ण मंदिरापर्यंत पदयात्रा करून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली. मुंबई उत्तर पश्‍चिम या मतदारसंघातून ते कधीच पराभूत झाले नाहीत. 1984 ते 2004 पर्यंत ते पाच वेळा संसदेत निवडून गेले. त्यांना राजकारणात राहूनही कोणताही स्वार्थ नव्हता किंवा पदाची लालसा नव्हती. एखाद्या लोकप्रतिनिधीने आपल्या क्षेत्रातील लोकांच्या आशाआकांक्षाबाबत, समस्यांबाबत, अपेक्षांबाबत किती संवेदनशील असले पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणून सुनील दत्त यांच्याकडे पाहता येईल.

राजेश खन्ना ः सुपरस्टार हे बिरूद ज्याने मिरवले त्या राजेश खन्नानेही चित्रपटातील आपले स्थान डळमळीत झाल्यानंतर राजकारणाची वाट पकडली. त्यांचा नवी दिल्लीतून लोकसभेची निवडणूक लढवली. 1991 मध्ये भाजपचे दिग्गज नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याकडून केवळ 1589 मतांनी त्याचा पराभव झाला होता. पण 1992 मध्ये पोटनिवडणुकीत राजेश खन्नानी शत्रुघ्न सिन्हाला पराभूत करून संसद गाठली. 1996 मध्ये राजेश खन्नांचा पराभव झाला. राजकीय कारकिर्दीत ते सुपरस्टार म्हणून मिरवू शकले नाही.

2014 मध्ये सर्वच पक्षांनी फिल्मी कलाकारांवर बाजी लावली होता. राज बब्बर, शत्रुघ्न सिन्हा आणि जयाप्रदा यांसारख्या अनुभवी नेत्यांसमवेत नवखी नगमादेखील मैदानात उतरली होती. तृणमूल कॉंग्रेसने मुनमुन सेनला खासदार बनवण्याचे निश्‍चित केले. मुनमुन सेन बांकुरामध्ये तृणमूलची उमेदवार होती तर विश्‍वजीत दिल्लीतून उमेदवार होते.
यंदाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने ओडिशातील भुवनेश्वरच्या जागेवरून बिजय मोहंती आणि अपराजिता मोहंतीला कटक जागेवरून उमेदवार घोषित केले आहे. पराभवाला घाबरत नसल्याचे ते सांगतात. भाजपने ओडिसामध्ये पिंटू नंदा, श्रीतम दास आणि पिंकी प्रधान या कलाकारांची मदत घेतली आहे; तर सत्तारूढ बीजू जनता दलाने मिहिल दास, सात्यकी मिश्रा यांच्याबरोबर गायिका तृप्ती दास यांना पक्षात सामील करून घेतले आहे. ओडिसामध्ये चित्रपट कलाकारांनी निवडणूक लढवण्याची सुरूवात सत्तरच्या दशकात सरत पुजारी यांनी केली होती. त्यानंतर संगीतकार गायक अक्षय मोहंती, प्रफुल्लकर आणि धीर विस्वाल यांच्या पराभवाने हा उत्साह थंड पडला. राज्याचे माजी मंत्री पंचानन कानुनगो यांच्या मते आमचे नेते नाटके करण्यात व्यग्र राहिल्याने सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकले नाहीत. कलाकार नेत्यांपेक्षा अधिक चांगला अभिनय करतात असे त्यांना वाटत असेल. सर्वात रंजक मुकाबला झाला तो चंडीगढमध्ये. माजी मिस इंडिया असलेल्या गुल पनागने आम आदमी पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली. तिच्यासमोर भाजपने तिकीट दिले ते चरित्र अभिनेत्री किरण खेरला. अर्थात निवडणुकीच्या मैदानात बाजी मारली ती किरण खेर यांनीच !

आपण इतिहासात डोकावून पाहिले तर 1967 मध्ये चित्रपट क्षेत्रातील एकच सदस्य लोकसभेत पोहोचला होता. 1971 ते 1977 या कालावधीत चित्रपट क्षेत्राचे प्रतिनिधित्व शून्य होते. 1980 मध्ये अभिनेत्री वैजयंतीमालाने हा दुष्काळ संपवला. तिने दिल्ली आणि तमिळनाडूमधून दोन वेळा निवडणूक जिंकली होती. याचा व्यापक विस्तार झाला तो 1984 मध्ये. त्यावेळी सुनील दत्त आणि अमिताभ बच्चन हे त्याकाळातील आघाडीचे नेते होते. त्यावर्षी चित्रपट क्षेत्रातील पाच कलाकार लोकसभेत पोहोचले पण त्यापैकी केवळ सुनील दत्त यांनीच राजकारणाकडे गांभीर्याने पाहिले. गांधी परिवाराशी निगडित असलेल्या अमिताभने 1984 मध्ये अलाहाबादमधून निवडणूक जिंकली तेव्हा हेमवती नंदन बहुगुणांसारख्या दिग्गजांचा पराभव केला होता. अर्थात अमिताभ बच्चन यांची महत्त्वाकांक्षा कमी आणि कौटुंबिक मित्र राजीव गांधींची मदत करण्याची इच्छाच अधिक होती. तेव्हा अमिताभ बच्चनच्या चित्रपटाच्या कारकिर्दाला मरगळ आली होती. त्यामुळे त्यांना राजकारणात व्यस्त होण्यास फारसा त्रास घ्यावा लागला नाही. पण बोफोर्स प्रकरणात अमिताभ बच्चन यांच्यावर शिंतोडे उडाले आणि यानंतर राजकारणात त्यांना फारसा रस वाटला नाही. काही काळानंतर अमिताभ यांचा गांधी कुटुंबीयांबरोबर दुरावाही वाढत गेला. त्यानंतर अमरसिंह यांच्यामुळे अमिताभची मुलायमसिंह यादव यांच्याशी सलगी वाढली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.