इंटरपोलची आमसभा 2022 मध्ये भारतात

नवी दिल्ली  -इंटरपोल या शक्तिशाली आंतरराष्ट्रीय पोलीस यंत्रणेची आमसभा 2022 मध्ये होणार आहे. याआधी भारतात केवळ एकदा (1997) इंटरपोलची आमसभा झाली आहे.

इंटरपोलची स्थापना 1923 मध्ये झाली. त्यावेळी आंतरराष्ट्रीय पोलीस आयोग असे नाव त्या यंत्रणेला देण्यात आले होते. त्या यंत्रणेला 1956 पासून इंटरपोल म्हणून ओळखले जाऊ लागले. त्या यंत्रणेचे 194 देश सदस्य आहेत. भारताने 1949 मध्येच त्या यंत्रणेचे सदस्यत्व स्वीकारले. सदस्य देशांच्या पोलिसांमध्ये समन्वय ठेवण्याचे कार्य इंटरपोल करते. परदेशात पलायन करणाऱ्या गुन्हेगारांना पकडून संबंधित देशाच्या हवाली करण्याच्या प्रक्रियेत त्या यंत्रणेचा मोठा वाटा असतो.

इंटरपोलचे मुख्यालय फ्रान्समध्ये आहे. त्या यंत्रणेची आमसभा दरवर्षी होते. त्या आमसभेत महत्वाचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे इंटरपोलच्या आमसभेचे आयोजन करण्याची मिळालेली संधी भारताच्या दृष्टीने महत्वाची घडामोड मानली जात आहे. इंटरपोलचे सरचिटणीस जरगेन स्टॉक ऑगस्टमध्ये भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यावेळी झालेल्या भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना आमसभेचे आयोजन भारतात करण्याविषयीचा प्रस्ताव दिला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)