कामाचा खोळंबा; अधिकारी, नागरिकांना होतोय मनस्ताप
वडगाव मावळ – येथील दुय्यम निबंधक कार्यालयाची बीएसएनएलची ओएफसी केबल वारंवार खंडित होत असल्याने तासंतास इंटरनेट सेवा ठप्प होत आहे. याचा मनस्ताप अधिकारी, कर्मचारी व खरेदीविक्री इतर दस्त नोंदणी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सहन करावा लागत आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयात सुरळीत इंटरनेट सेवा उपलब्ध करण्याची मागणी बीएसएनएल कार्यालयात केली आहे. इंटरनेट सेवा ठप्पचा लपंडाव मागील आठवड्यांपासून सुरू आहे. दिवसाला 30 ते 35 दस्त नोंदणी होत होती पण या इंटरनेट लपंडावामुळे दिवसाला 1 ते 3 दस्त नोंदणी होत आहे. गुरुवार (दि. 5) रोजी कार्यालयात भेट दिली असता, परिस्थिती निदर्शनास आली.
महाराष्ट्र शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल देणाऱ्या वडगाव मावळ दुय्यम निबंधक कार्यालयात बीएसएनएलची ओएफसी केबल खंडित होत आहे. त्यातच मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे, लोणावळा, वडगाव आदी ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. या कार्यालयाचा वार्षिक महसूल 375 कोटी रुपये आहे. यात वडगाव व तळेगाव दाभाडे कार्यालयाचा वार्षिक प्रत्येकी 75 कोटी महसूल असून लोणावळा कार्यालयाचा 125 कोटी रुपये आहे. पण तिन्ही कार्यालये अद्यापही भाडेतत्त्वावर आहेत. ही कार्यालये अपूर्ण जागेत असल्याने दस्त ठेवण्यासाठी जागा अपूर्ण आहे.
महाराष्ट्राचे काश्मीर म्हणून मावळची ओळख आहे. पुणे-मुंबई या दोन महानगराच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्याच्या जमिनीचे आकर्षण महाराष्ट्रासह देशातील नेते, अभिनेते, उद्योजक व धनिकांना आहे.
दस्त खरेदी व विक्री करण्यासाठी आलेले नागरिक हे पुणे, मुंबई सह देशभरातून आलेले असतात. या कार्यालयात वारंवार बीएसएनएलची ओएफसी केबल खंडित होते. इंटरनेट सेवा ठप्प पडल्याने अधिकारी, कर्मचारी व नागरिक तासंतास ताटकळत उभे असतात.
खरेदी विक्री दस्त करण्यासाठी मोठ्या मेहनतीने सर्व साक्षीदार, हिस्सेदार यांना एकत्र केले जाते. यात बाहेरून आलेले नागरिक घरी जाण्यासाठी तात्काळ दस्त होण्यासाठी तळेगाव दाभाडे, लोणावळा व वडगाव असे फिरतात. पण बीएसएनएल इंटरनेट सेवा ठप्प असल्याने वेळ व पैसा खर्च होतो. काही वेळा अधिकारी व नागरिक यांच्या वादाचे प्रकार घडतात. यात खरेदी विक्रीसाठी आलेले वयोवृद्ध नागरिक आजारी असतात. त्यांना या ठिकाणी इंटरनेट नसल्याने मरण यातना सहन कराव्या लागतात.
या कार्यालयाला अखंडित इंटरनेट सेवा उपलब्ध करण्याची मागणी ऍड. राकेश वहिले, ऍड. चंद्रकांत खांदवे, ऍड. अजित वहिले, ऍड. आम्रपाली जाधव, ऍड अमित शिंदे, ऍड. रोहित शेटे, विलास शिंदे, विशाल वहिले, अलताफ सय्यद सौरभ सावले यांनी केली.
कार्यालयाच्या बीएसएनएलच्या ओएफसी केबल खंडित होत असल्याने इंटरनेट सेवा ठप्प होते. यामुळे कार्यालय सुरू असूनही इंटरनेट अभावी दस्त नोंदवता येत नाही. प्रसंगी वादाचे प्रकार घडत आहेत. अखंडित इंटरनेट सेवा उपलब्ध करण्याची मागणी पुणे व मावळ बीएसएनएलच्या कार्यालयात केली आहे.
– जितेंद्र बडगुजर, दुय्यम निबंधक