दहशतवाद, कट्टरवादासाठी इंटरनेटचा वापर रोखायला हवा

“जी-20’मध्ये ठराव

ओसाका, (जपान), – दहशतवादाचा प्रसार, कट्टरतावादासाठी निधी संकलनासाठी इंटरनेटचा वापर रोखण्याचा ठराव “जी-20′ परिषदेदरम्यान करण्यात आला. इंटरनेटचा वापर खुला, मोफत आणि सुरक्षित राहिला पाहिजे, इंटरनेटचा वापर दहशतवाद्यांकडून सुरक्षित आश्रयस्थान म्हणून केला जाऊ नये, असेही या ठरावामध्ये म्हटले आहे. ओसाकामधील “जी-20′ परिषदेनंतर प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनामध्ये सर्व सहभागी देशांच्या नेत्यांनी या ठरावाला मंजूरी दिली असल्याचे म्हटले आहे.

नागरिकांची सुरक्षितता ही आपली सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. दहशतवादाला विरोध आणि अटकाव ही देशांची सर्वात पहिली भूमिका आहे. सर्व प्रकारच्या दहशतवादी कृत्यांना विरोध करण्यासाठी आमची बांधिलकी असून त्याचा तीव्र शब्दात आपण निषेध करत आहोत आणि इंटरनेटचा दहशतवादाच्या प्रसारासाठी वापर पूर्ण निषेधार्ह असल्याचे या नेत्यांनी म्हटले आहे.

न्यूझिलंडमधील ख्राईस्टचर्चमधील दहशतवादी हल्ल्यात 51 जण ठार झाले होते. त्यासारख्या हल्ल्यांमुळे संयुक्‍त राष्ट्राचे विविध ठराव, संयुक्‍त राष्ट्राच्या दहशतवादविरोधी धोरणांचा आणि अन्य संस्थांच्या ठरावांच्या तातडीने अंमलबजावणीची आवश्‍यकता आहे. तसेच मानवी हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण व्हायला हवे. दहशतवादाचा प्रसार, भरती, निधी संकलन, कट-कारस्थाने करणे यासाठी इंटरनेटचा वापर रोखायला हवा असल्याचेही या ठरावामध्ये म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)