#InternationalYogaDay: अबू-धाबी येथे केली नागरिकांनी ‘योग’दिनाची जनजागृती

योग ही भारताची अतिशय प्राचीन ज्ञानशैली असून, अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये या विषयी सांगण्यात आले आहे. भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. मुळात योग हा विचार, संयम आणि पूर्णत्व प्रदान करणारा आहे. त्याचप्रमाणे प्रकृतीस्वास्थ्यासाठी आणि विश्वाच्या भल्यासाठी एक समग्र दृष्टिकोण प्रदान करणारा आहे.

‘योग’ हा शब्द युज्‌ या मूळ संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. याचा अर्थ आत्म्याचा परमात्म्याशी संयोग किंवा आत्म्याचा चराचरात व्यापून उरलेल्या चेतनेशी संयोग असा होतो. शारीरिक व्यायाम, भावनात्मक समतोल आणि आध्यात्मिक प्रगती यासाठी योग महत्त्वाचा आहे. आणि याच ज्ञानशैलीचे महत्त्व लक्षात घेऊन त्याबाबत जनजागृती करण्यासाठी संयुक्‍त राष्ट्रसंघाने सन 2014 मध्ये ’21 जून’ हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठींबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. आणि याच ‘योग’ दिनाचे औचित्य साधून भारतासह इतर देशांमध्ये देखील ‘योग’ ज्ञानशैलीचे महत्व वाढल्याचे चित्र दिसून येत आहे.

अबू-धाबी येथे देखील ‘योग’ दिनाचे औचित्य साधून येथील प्रसिद्ध अश्या ठिकाणी काही नागरिकांनी योगाची जनजागृती केली आहे. यामध्ये ‘एमिरेट्स पैलेस’, ‘लावरे म्यूजियम’ आणि ‘एथिल टॉवर’ यांचा समावेश होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×