माद्रिद – स्पेनने आपली आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटनावरील निर्बंध उठवून इतर देशांतील पर्यटकांसाठी पुन्हा एकदा देशाच्या सीमा खुल्या केल्या आहेत. स्पेनमध्ये करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशात तीन महिन्यांपासून लागू करण्यात आलेली राष्ट्रीय आणीबाणी हटविण्यात आली आहे.
सरकारने देशात 14 मार्चपासून राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती. मात्र, आता निर्बंध हटविल्यामुळे स्पेनवासी संपूर्ण देशात पुन्हा एकदा स्वतंत्रपणे संचार करू शकतात.
काही आठवड्यांपासून हळूहळू निर्बंधात शिथिलता दिली जात आहे. ब्रिटनसहित यूरोपीय देशांतील नागरिक स्पेनमध्ये पर्यटनासाठी येऊ शकतात. कारण स्पेनने दुसऱ्या देशातील पर्यटकांसाठी 14 दिवस विलगीकरण करण्याची पद्धत रद्द केली आहे.
तीन महिन्यांपासून सर्व आर्थिक व्यवहार शून्य झाल्यामुळे पर्यटनानिमित्त देशाकडे पुन्हा पेशांचा ओघ सुरू होईल, असा यामागचा स्पेन सरकारचा हेतू आहे.