नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओए) संयुक्त राष्ट्र व इंटरपोलच्या सहकार्याने काही कागदपत्रे व त्यातील नोंद जाहीर केली आहे. त्यानुसार जगभरातील क्रीडा संघटनांना खेळाडू व सपोर्ट स्टाफच्या मानधनात कपात करू नये अन्यथा भ्रष्टाचार वाढेल, असा इशारा दिला आहे.
करोनाचा धोका जगभरात अद्यापही कायम असताना अनेक देशांच्या क्रीडा संघटनांनी आपला स्टाफ कमी केला आहे. तसेच असलेल्या स्टाफच्या वेतनात व मानधनात मोठी कपात केली आहे. यावरून अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे. हे लोण केवळ एका देशापुरते मर्यादित नसून सर्वच देशांच्या क्रीडा संघटनांमध्ये पसरलेले आहे.
करोनामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा एकतर लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत, तर काही स्पर्धा रद्दच कराव्या लागल्या आहेत. अशा स्थितीत अनेक क्रीडा संघटनांचे प्रायोजकांशी असलेले करारही संपुष्टात आल्याने अनेक क्रीडा संघटनांना कामकाज चालवणे व कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच मानधन देणे ही परवडत नसल्याने या क्षेत्रात मोठी कपात केली आहे.
क्रीडा स्पर्धांवर बेटिंग घेणारे, सट्टेबाजी करणारे तसेच फिक्सिंगची लालूच दाखवणारे अनेक गट सक्रिय आहेत. ज्या खेळाडूंना तसेच सपोर्ट स्टाफच्या वेतनात तसेच मानधनात कपात केली आहे, त्यांना पैशांचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले जाण्याचा धोका आहे, असे स्पष्ट मत संघटनेने व्यक्त केले आहे.