– आरिफ शेख
गाझा पट्टीत सहा ओलिसांचे मृतदेह सापडल्यानंतर इस्रायली नागरिक आपल्याच सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. स्वतःच्या सत्तेसाठी युद्धविराम न केल्याचा आरोप आता पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्यावर होत असून त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्रीही नेत्यानाहू यांच्यावर नाराज आहे. युद्धबंदी करण्यासाठी नेत्यानाहूवर घरातूनच दबाव वाढत आहे.
इस्रायली सैन्याने सांगितले, की त्यांना दक्षिण गाझामधील रफाह येथे सहा मृतदेह सापडले. यामध्ये एका अमेरिकन नागरिकाचाही समावेश आहे. त्यानंतर सुरू झालेल्या आंदोलनात तीन लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. लोकांनी सहा मृतदेहांचे प्रतीक म्हणून सहा शवपेट्या ठेवल्या होत्या. नेतान्याहू यांच्या घराबाहेरही हजारो लोकांनी गोंधळ घातला. पाच लाखांहून अधिक लोक जमल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. आंदोलक युद्धविराम आणि उर्वरित ओलिसांची सुटका करण्याची मागणी करत होते. हा करार झाला असता, तर ओलिसांची सुटका करता आली असती; परंतु नेतान्याहू राजकीय कारणांसाठी तडजोड करू इच्छित नाहीत. इस्रायलच्या कामगार संघटनेनेही देशभरात संपाची घोषणा केली. त्यामुळे बेन-गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावरही परिणाम झाला आहे. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलांट हे आपल्याच सरकारवर नाराज झालेले दिसले. ओलिसांना मुक्त करण्याऐवजी सीमेवर कब्जा करण्याला सरकार प्राधान्य देत असल्याचे ते म्हणाले. असेच चालू राहिल्यास उरलेल्या ओलिसांची कधीही सुटका होणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, शवविच्छेदनाच्या 48 ते 72 तास आधी ओलिसांची हत्या करण्यात आली होती. शवविच्छेदन करणार्या अबू कबीर फॉरेन्सिक इन्स्टिट्यूटने उघड केले, की ओलिसांवर जवळून अनेक वेळा गोळ्या झाडण्यात आल्या. हमासचे नेते खलील अल-हय्या यांनी ओलिसांच्या मृत्यूसाठी नेतान्याहू यांना जबाबदार धरले आहे. ‘अल-जझिरा’ला दिलेल्या मुलाखतीत अल-हय्या म्हणाले, नेतन्याहू आणि त्यांचे ‘अतिरेकी’ सरकार हे ओलिसांच्या मृत्यूचे कारण आहे. 7 ऑक्टोबर रोजी हमासने पकडलेल्या 251 लोकांपैकी 97 अजूनही गाझामध्ये असल्याचे मानले जाते.
इस्रायलवर 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यादरम्यान हमासने ओलीस ठेवलेल्यांना सोडविण्यासाठी करार करण्यात नेत्यानाहू अयशस्वी ठरले, असा नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान, हिस्ताद्रुत कामगार संघटनेचे नेते अनॉन बार-डेव्हिड यांनी सरकारवर युद्धविराम करार करण्यासाठी दबाव आणण्याच्या हेतूने राष्ट्रीय संप केला. दुसरीकडे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जवळ येत चालल्याने गाझा पट्टीतील संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्यावर दबाव येत आहे.
त्यामुळे ते आता नेत्यानाहू यांना जास्त काळ पाठीशी घालू शकतील, अशी स्थिती नाही. ‘सीएनएन’च्या वृत्तात अमेरिकन आणि इस्रायली अधिकार्यांच्या हवाल्याने म्हटले आहे, की अंतिम युद्धविराम करारानुसार ओलिसांपैकी काहींची सुटका केली जाईल. यापूर्वी जून 2023 मध्ये नागरिक लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने नेतान्याहू यांना न्यायिक सुधारणांची योजना पुढे ढकलावी लागली होती. एका अहवालानुसार, फिलाडेल्फिया कॉरिडॉरवर इस्रायलच्या ताब्यामुळे हमास नाराज आहे. ओलिसांची सुटका करणे ही आमची प्राथमिकता असायला हवी, असे संरक्षणमंत्री गॅलंट म्हणाले.
त्यांना सोडल्यानंतर, आम्ही 8 तासांच्या आत फिलाडेल्फिया कॉरिडॉर कॅप्चर करू शकतो, असा त्यांचा दावा आहे. नेतान्याहू व गॅलांट यांच्यात गाझामधील ओलीस आणि युद्धविराम कराराच्या अटींवरून वाद आहे. फिलाडेल्फिया कॉरिडॉर हा गाझा आणि इजिप्तमधील बफर झोन आहे. त्याच्या करारावर चर्चा सुरू आहे. नेतान्याहू मात्र शरणागती पत्करायला किंवा युद्धबंदी करायला तयार नाहीत. अशा प्रकारचे पाऊल दहशतवादासाठी बक्षीस असेल आणि हमासला एक चुकीचा संदेश जाईल, की इस्रायलच्या ओलिसांना मारणे फायदेशीर ठरते, असे नेतान्याहू यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सांगितले.
युद्धविराम आणि ओलीस कराराची मागणी करणारी संपूर्ण इस्रायलमधील निदर्शने मागील आठवड्यांच्या तुलनेत वाढली आहेत. इस्रायली मीडिया रिपोर्टस्मध्ये दावा करण्यात आला आहे, की ओसांच्या मृत्यूबद्दलचा संताप ही एक ठिणगी बनू शकते. त्यामुळे इस्रायलमधील चळवळ पुन्हा पेटू शकते. नेतान्याहू यांचे सरकार हटवून नवीन निवडणुका घेण्याची मागणी केली जात आहे. नेत्यानाहू इस्रायलच्या इतिहासात दीर्घकाळ पंतप्रधान राहिले असले, तरी त्यांच्याच विरोधात एका वर्षात दोनदा लाखो लोक रस्त्यावर येत आहेत. सर्वसहमतीचे सरकार असताना त्यांना आता कारभार करणे कठीण होत चालले आहे. शेवटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेत्यानाहू व गॅलांट यांच्यात जोरदार वाद झाला.
सहा ओलिसांचा मृत्यू अशा वेळी झाला आहे, जेव्हा अमेरिका 31 मे च्या कराराला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करत आहे. या करारानुसार, ओलिसांना सहा आठवड्यांत 18-33 चा फॉर्म्युला वापरून सोडण्यात येणार होते. त्या बदल्यात युद्धात शांतता प्रस्थापित करायची आणि इस्रायलने पॅलेस्टिनी कैदी आणि दहशतवाद्यांची सुटका करायची, असे ठरले होते. कराराचे मुख्य मध्यस्थ कतार आणि इजिप्तसह अमेरिका, फिलाडेल्फिया कॉरिडॉरच्या समस्येचे निराकरण करण्यात अयशस्वी ठरले आहे. कराराच्या पहिल्या टप्प्यात इस्रायली सैन्याने या बफर झोनमधून माघार घ्यावी, असा हमासचा आग्रह आहे; मात्र या अटीला इस्रायल सध्या तयार नाही.
कार्मेल गॅट, अलेक्झांडर लोबानोव, अल्मोग सरुसी, ओरी डॅनिनो, इडेन येरुशल्मी आणि हर्ष गोल्डबर्ग-पोलिन अशी ठार करण्यात आलेल्या ओलिसांची नावे आहेत. सहा ओलिसांपैकी, पाच मैफलीत पकडले गेले आणि सहाव्याला जवळच्या किबुत्झमधून अपहरण करण्यात आले. अल्मोग सरुसी हे इस्रायलच्या रानानाचे संगीत निर्माते होते. नॉव्हेल फेस्टिव्हलमध्ये त्याची वागदत्त वधू शहार गिंडीही त्याच्यासोबत होती. दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला असता गिंडीला गोळी लागली आणि ती गंभीर जखमी झाली. तथापि, गिंडीचा नंतर मृत्यू झाला आणि हमासच्या लोकांनी सरुसीला सोबत नेले. 32 वर्षीय इस्रायली-रशियन अलेक्झांडर लोबानोव हा या महोत्सवात मुख्य बारटेंडर होता. कुटुंबीयांनी सांगितले, की पकडले जाण्यापूर्वी तो व इतर पाच लोक ऑलिव्ह ग्रोव्हमध्ये लपले.
39 वर्षीय थेरपिस्ट कार्मेल गेट भारतातून इस्रायलला परतले होते. बिरी किबुत्झ येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरातून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अपहरण करण्यात आले. हमासच्या बॉम्बस्फोटानंतर गॅटची आई मरण पावली आणि त्याची मेहुणी यार्डन रोमन-गॅट हिचे अपहरण करण्यात आले. इडेन येरुशल्मी नोव्हा फेस्टिव्हलमध्ये बारटेंडर होती. तिची बहीण शनीच्या म्हणण्यानुसार, तिने 7 ऑक्टोबर रोजी सशस्त्र लोकांना हल्ला करताना पाहिले. लपण्याच्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात ती अयशस्वी झाली आणि गाझाला नेण्यापूर्वी तिचे शेवटचे शब्द होते: शनी, त्यांनी मला शोधले. ओरी डॅनिनो या सैनिकाचे हमासने अपहरण केले. तो आपले मित्र ओमेर शेमटोव्ह, माया आणि इटाय रेगेव्ह यांना सोडविण्यासाठी नोव्हा फेस्टिव्हलला गेला होता. तेथून या लोकांना पकडून नेण्यात आले. या ओलिसांच्या मृत्यूवरून नेत्यानाहू यांच्यापुढे पेच उभा राहिला आहे. देशांतर्गत दबाव असताना देखील नेत्यानाहू यांची युद्धखोरवृत्ती नेमस्त होण्याची चिन्हे नाहीत.