जागतिक पुरुष दिन : समानता, कर्तव्यांसह पुरुषांच्या हक्‍कांबाबतही विचार व्हावा

संकलन : प्रियंका म्हेत्रे 

सामाजिक कार्यकर्त्यांची अपेक्षा

पुणे -“कुटुंबाचा पोशिंदा, आधार अशी बिरुदे लावणाऱ्या पुरुषांकडून नेहमीच खंबीरपणाची अपेक्षा ठेवली जाते. पुरुषांची जबाबदारी, कर्तव्यांबाबत नेहमीच चर्चा होते. मात्र, त्यांच्या अधिकाराबाबत फारसे बोलले जात नाही. देशात महिलांसाठी विविध योजना, कायदे आहेत. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. मात्र, त्याचवेळी पुरुषांसाठी कोणतेही विशेष कायदे, योजना, संस्था नाहीत. त्यामुळेच समानतेच्या तत्त्वाबाबत बोलताना कर्तव्यांसह पुरुषांच्या हक्‍कांबाबतही विचार होणे आवश्‍यक आहे,’ अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केली आहे.

जगभरात 19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक पुरूष दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने लैंगिक समानतेस प्रोत्साहन, पुरुषांचे आरोग्य सुधारणे, आत्महत्या कमी करणे याबाबत जागृतीसाठी प्रयत्न केला जातो. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार, देशातील आत्महत्यांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 2015च्या अहवालानुसार देशात आत्महत्या करणाऱ्या नागरिकांची संख्या 1 लाख 33 हजार 623 इतकी होती. यापैकी पुरुषांची संख्या 91 हजार 528 होती. तर, लॅन्सेट अहवालानुसार व्यवस्थित व पुरेसा आहार न घेतल्यामुळे पुरुषांमध्ये ऍनिमियाचे प्रमाण वाढत आहे. आजारी पडल्यावर पुरूष लवकर दवाखान्यात जात नाहीत. घरच्या घरी उपचार करण्यावर भर असतो.

सर्वसामान्य जीवनातही पुरुषांबाबत फारसा विचार होत असल्याचे आढळत नाही.त्यामुळेच बस, रेल्वे यासारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांसाठी विशेष आरक्षण, सुविधा उपलब्ध केल्या जातात. मात्र, पुरूषांसाठी असा कोणताही विचार होत नाही. पुरुषांच्या हक्‍कांबाबत काम करणाऱ्या ऑल इंडिया मेन्स वेलफेअर असोसिएशनने महिला विकास मंत्रालयासारखे पुरूष विकास मंत्रालय असे स्वतंत्र मंत्रालय असावे, अशीही मागणी केली आहे. मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही.स्त्री आणि पुरुष हे दोघे समान आहेत, दोघे मिळून घर चालवू शकतात, स्त्रीला जसे रडू येते तसेच पुरूषही रडू शकतो त्यालाही भावभावना असतात या विचारांचा स्वीकार अलीकडे भारतीय समाज करत आहे.
नवऱ्यापेक्षा बायको जास्त कमवते मात्र अशावेळी स्त्रीचे कर्तृत्त्व स्वीकारण्यापेक्षा पुरूषाला दुर्बलतेची दूषणे लावण्याचे प्रकार समाजात घडतात. हे टाळणेही गरजेचे आहे.

स्त्री किंवा पुरुष असण्याच्या अगोदर माणूस म्हणून समोरच्याकडे पाहणे हा दृष्टीकोन व्यापक होण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर जागतिक पुरूष दिन साजरा होणे गरजेचे आहे. जशी स्त्री ही स्त्रीत्वाच्या पिंजऱ्यातून मोकळी होण्यासाठी लढत आहे तशीच पुरूषही व्यवस्था लादू पाहत असलेल्या पुरूषपणाच्या जोखडातून मुक्‍त होऊ पाहत असतील, माणूस म्हणून जगू पाहत असतील तर पुरूष दिन साजरा करणे स्वागतार्ह आहे.
– गीताली वि. मं., सामाजिक कार्यकर्त्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)