साहसी क्रीडा प्रकार : प्रशिक्षण 18 जानेवारीपर्यंत सुरू राहणार
लोणावळा – येथील शिवदुर्ग मित्र, लोणावळा व स्लॅकलाइन इंडिया असोसिएशन यांच्या वतीने लोणावळा येथे देश-विदेशातील स्लॅकलायनर, हायलाइनर एकत्र करुन त्यांच्यासाठी “गदरिंग’ तसेच ट्रेनिंग कार्यक्रम सुरू केला आहे.
स्लॅकलाइन या साहसी क्रीडा प्रकार म्हणजे दोरवरुन चालणे. हा प्रकार भारतात प्रचलित होत चालला आहे. याचाच पुढील प्रकार म्हणजे दोन उंच डोंगरावर दोरी बांधून त्यावर बॅलन्स करत चालणे. याला हायलाइन म्हणतात. हायलाइन या प्रकारात भारतात प्रथम हायलाइन करण्याचा मान शिवदुर्गचे संचालक रोहित वर्तक यांनी मिळवला आहे. रोहित याने हा क्रीडा प्रकार वाढवण्यासाठी अनेक खेळाडू तयार केले आहे.
लोणावळ्यातील ड्युक्स नोज (नागफणी) पायथा, कुरवंडे याठिकाणी आयोजित या कार्यक्रमात स्लॅकलायनर, हायलाइनर याची काही प्रात्यक्षिके दाखवली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय किर्तीचे 10 खेळाडू व भारतातील अनेक खेळाडू यात सहभागी झाले आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी यापूर्वी सुमारे एक किलोमीटर लाइनवर चालून विश्वविक्रम केलेले आहेत. या वेळी लोणावळ्यात सुमारे 1.3 किलोमीटर लाईन लावून ते खेळाडू स्वतःचे विक्रम तोडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहेत. 18 जानेवारीपर्यंत हे गॅदरिंग सुरू राहणार आहे.
शिवदुर्ग मित्र, लोणावळा ट्रेकिंग ऍडव्हेंचर क्लब हा ट्रेकिंग, क्लायबिंग, रेस्क्यू, ऍनिमल रेस्क्यू, सांस्कृतिक, फिटनेस, सायकलिंग, कबड्डी या विविध क्षेत्रात कार्यरत आहे.
याशिवाय साहस क्रीडा प्रकाराचे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रशिक्षणाचे धडे संस्थेमार्फत दिले जातात. स्लॅकलायनर, हायलाइनर या खेळात कोणत्याही प्रकारचे धोके नाही, सुरक्षेचे सर्व उपाययोजना करून हा खेळ खेळला जाईल. तरी नागरिकांनी उपस्थित राहून या खेळाची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन शिवदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.