पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार आणि इतर सुविधांच्या बांधकामासंदर्भातचा मार्ग आता सुखकर झाला. धावपट्टी विस्तारिकरणासाठीचा आॅबस्टॅकल लिमिटेशन सर्वेक्षण (ओएलएस) अहवाल सकारात्मक आल्याने, काही तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे, अशी माहिती नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुण्याहून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना चालना देण्यासाठी कोड ‘ई’ विमान चालवता यावीत, या दृष्टीने काही तांत्रिक बाबी पूर्ण करायच्या असल्याने नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयात उच्चस्तरीय तांत्रिक बैठक पार पडली.
या बैठकीत राज्य सरकारकडून भूसंपादन, संरक्षण मंत्रालयाकडून जमिनीचे हस्तांतरण, धावपट्टीची लांबी, नवीन टर्मिनल इमारत यासोबत इतरही विषयांवर चर्चा करण्यात आली.
या प्रकल्पाशी संबंधित इतर सर्वेक्षण करून संरक्षण मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्याशी सहकार्य आणि समन्वय ठेवण्याच्या सूचना भारतीय विमानतळ प्राधिकरणाला दिल्या.
यावेळी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे सचिव वुम्लानमंग वुलनाम, संरक्षण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव दीप्ती मोहिल चावला,
विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षा एम. सुरेश, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ग्रुप कॅप्टन मनोज राणा, एअर मार्शल वाय. के. दीक्षित, पुणे विमानतळाचे संचालक संतोष ढोके उपस्थित होते.