करोनाच्या नव्या प्रकारामुळे सौदीत आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद

रियाध : ब्रिटनमध्ये करोनाचा एक नवीन प्रकार आढळून आला आहे. हा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचे तिथल्या ब्रिटनच्या प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सौदी अरेबियाने सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्थगिती आणखी आठवडयाभरासाठी वाढवली जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

सौदीच्या जीएसीए (नागरी उड्डाण प्राधिकरण)ने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. जगभरातील अनेक देश आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद करत असून ब्रिटनवरून येणाऱ्या प्रवाशांना देशात येण्यास प्रवेशबंदी करण्यात येत आहे. करोनाचा हा नवीन प्रकार वेगाने फैलवणारा असून नियंत्रणा बाहेर असल्याचे ब्रिटनच्या तज्ज्ञांचे मत आहे.

काही अपवाद वगळता सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आठवड्याभरासाठी विमानसेवा बंद करण्यात येत आहे. आणखी आठवड्याभरासाठी ही बंदी वाढवली जाऊ शकते. सौदीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व परदेशी विमानांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आलीय असे जीएसीएच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

मागच्या आठवड्यात सौदीमध्ये फायझरची लस पोहोचली. लवकरच तिथे लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सौदीमध्ये आतापर्यंत तीन लाख ६१ हजार पेक्षा जास्त करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यात सहा हजारपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.