बारामती : ग्राम परी एम. आर. ए. सेंटर, पाचगणी आणि आंतरराष्ट्रीय शेतकरी संवाद संस्था यांच्या वतीने सात देशांतील सेंद्रिय शेतकरी समूहाने नुकतीच दयोदय गोशाळेला अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेट दिली. या अभ्यास दौऱ्यात एकूण ३० सेंद्रिय शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी देशांमध्ये फ्रान्स, मेक्सिको, सुदान, केनिया, कंबोडिया, बुरुंडी आणि वृंडाएस यांचा समावेश होता. शेतकरी समूहाने दयोदय गोशाळा, कुसुम बाग सेंद्रिय शेती प्रकल्प आणि इतर सामाजिक उपक्रम प्रत्यक्ष पाहून माहिती घेतली. येथील नाविन्यपूर्ण उपक्रमांविषयी कौतुकाची भावना व्यक्त केली.
गोशाळेतील व्यवस्थापनाचे निरीक्षण
दयोदय गोशाळेमध्ये ३०० गायींची सेवा केली जाते. गोमातेच्या आहार, लसीकरण, सुरक्षा, निवास व्यवस्था तसेच संरक्षण आणि संवर्धनाबाबत सविस्तर माहिती मिळाल्यानंतर परदेशी गोपालक अत्यंत आनंदित झाले. त्यांनी गोशाळेतील व्यवस्थापन आणि देखरेख पाहून ती “आदर्श गोशाळा” असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी शेतकऱ्यांनी गोशाळेतील “अनुभव केंद्र” (Experience Center) पाहिले आणि या संकल्पनेचे विशेष कौतुक केले.
सेंद्रिय शेतीसाठी मार्गदर्शन
दयोदय गोशाळेचे विश्वस्त श्री. अतुल शहा, सह-संस्थापिका सौ. संगीता शहा, कार्यकारी अधिकारी श्री. बाळकृष्ण कुलकर्णी आणि श्री. राहुल भट यांनी उपस्थित शेतकऱ्यांना गोमूत्र व गोबरापासून तयार केलेले सेंद्रिय लिक्विड खत शेतीसाठी कसे फायदेशीर ठरते याची सविस्तर माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या शंकांचे समाधान करताना, अशा उपक्रमांची त्यांच्या देशात अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित आंतरराष्ट्रीय शेतकऱ्यांनी “आमच्या देशातही असे उपक्रम राबवण्यास आम्हाला प्रेरणा मिळाली” असे समाधान व्यक्त केले.