द हेग (नेदरलॅन्ड) – डोनाल्ड ट्रम्प यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयावर (International criminal court ) घातलेल्या निर्बंधांविरुद्ध सर्व सदस्य देशांनी उभे रहावे, असे आवाहन आयसीसीच्यावतीने करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी घातलेल्या निर्बंधांमुळे आयसीसीचे स्वातंत्र्य आणि निःपक्ष न्यायालयीन कामकाज धोक्यात आल्याचा आरोपही आयसीसीने केला आहे.
ट्रम्प यांनी काल एक कार्यकारी आदेश काढला आहे. आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने गेल्या वर्षी इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावले होते. गाझाविरुद्ध इस्रायलने छेडलेल्या युद्धावरून आयसीसीने हे वॉरंट बजावले होते. आयसीसीची ही कृती बेकायदेशीर असून अमेरिका आणि इस्रायलला लक्ष्य करण्यासाठी केलेली बिनबुडाची कृती असल्याचे ट्रम्प यांनी आपल्या आदेशात म्हटले होते.
तसेच आयसीसीच्या पदाधिकाऱ्यांना अमेरिकेत प्रवेश करण्यास मज्जाव करणारे आदेश ट्रम्प यांनी काल दिले आहे.
मात्र ट्रम्प यांनी घातलेल्या निर्बंधांवर आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाने जोरदार टीका केली आहे. आयसीसीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आयसीसीने पूर्ण पाठिंबा जाहीर केला असून यापुढच्या काळात जगभरात अत्याचार झालेल्या सर्व नरपराधांना न्याय मिळवून देण्यासाठीची कटिबद्धताही न्यायालयाने एका निवेदनात व्यक्त केली आहे.
आयसीसीचे सदस्य असलेल्या सर्व १२५ देशातल्या पक्षांनी, नागरी समाज गटांनी आणि जगभरातल्या सर्व देशांनी न्याय आणि मूलभूत मानवी हक्कांसाठी एकत्रितपणे ठाम उभे राहण्याचे आवाहन आयसीसीने केले आहे. मानवी हक्कविषयक गटांनी देखील ट्रम्प यांच्या आदेशांवर टीका केली आहे. हे आदेश म्हणजे जगभरात सामूहिक हिंसाचार करणाऱ्यांसाठी एक भेट असल्याचे म्हटले आहे.
आयसीसीच्या न्यायाधीशांच्याविरोधात अटक वॉरंट बजावून या न्यायालयाचे कामकाज रोखून धरण्याची सूचना रशियाने केली आहे.