केंद्र सरकारकडे पक्षी अभ्यासकांची मागणी
पुणे – “परदेशी पक्ष्यांच्या प्रवास मार्गांचा विविध आंतरराष्ट्रीय संस्थांतर्फे अभ्यास केला जात आहे. यासाठी विविध प्रयोगदेखील केले जात आहेत. मात्र, अनेकदा आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सामंजस्याच्या अभावामुळे यासंदर्भातील माहितीची देवाणघेवाण करण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पक्षी या अभ्यासासंदर्भात आंतरराष्ट्रीय आणि अंतर्गत सहकार्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,’ अशी विनंती पक्षी अभ्यासकांनी केली आहे.
पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या परदेशी पक्ष्यांच्या संवर्धनसंदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषदेत ही मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाचे प्रतिनिधी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री संस्थेचे प्रतिनिधी तसेच पक्षीशास्त्र अभ्यासक आणि पक्षीसंवर्धन क्षेत्रातील विविध आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते.
यावेळी अभ्यासकांनी आपले अनुभव संगितले. विविध संस्थांकडून परदेशी पक्ष्यांच्या प्रवास मार्गांचा (फ्लाय-वे) अभ्यास केला जात आहे. यासाठी पक्ष्यांच्या शरीरावर ट्रान्समीटर, जीआयएस यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक बॅन्ड यांसारखी विद्युत उपकरणे बसविण्यात येतात. हे पक्षी आपल्या देशाच्या सीमा भागातून प्रवास करताना अपघाताला बळी पडल्यास त्यांच्यासंबंधी माहिती त्या-त्या संबंधित यंत्रणेला देण्यासाठी व्यवस्था केली पाहिजे. तसेच इतर राष्ट्रांबरोबरही अशा प्रकारचे माहितीची देवाण-घेवाण संदर्भातील करार केला पाहिजे. तसेच देशांतर्गत असलेल्या विविध संस्थांनादेखील याबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केली जाणे आवश्यक असून, यासाठी पर्यावरण मंत्रालयाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आता यावर शासन काय पाऊल उचलतेय, हे पाहणे महत्त्वाचे आहे.