सर्वसाधारण सभा अचानक तहकूब करण्याची महापौरांवर नामुष्की
पिंपरीत सत्ताधाऱ्यांकडून सभाशास्त्राच्या नियमांना तिलांजली
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने सभाशास्त्राच्या नियम पायदळी तुडविले असल्याचे आरोप सोमवारी पुन्हा करण्यात आले. खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादनाचा विषय तहकूब करण्याला भाजप नगरसेवकांनी विरोध करताच कोणतीही सूचना आणि अनुमोदन नसताना महापौरांनी अचानक महासभेचे कामकाज तहकूब न करताच निघून गेल्या. महापौरांनी तहकुबीची सूचना व पुन्हा सभा घेण्याची तारीख व वेळ न सांगितल्याने काही नगरसेवक सभागृहात बसून राहिल्यानंतर अर्ध्या तासांनी महापौर सभागृहात आल्या. त्यावेळीही कोणीतीही सूचना न मांडता महापौरांनी सभेचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब केले.
2019 मधील डिसेंबर महिन्याची तहकूब सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादन करताना नुकसान भरपाई देण्याच्या कार्यपद्धत व धोरण महापालिकेने 2013 मध्ये निश्चित केले आहे. त्यात सन 2015 मध्ये बदल करण्यात आला होता. आता सत्ताधारी भाजपने पुन्हा या धोरणात नव्याने बदल करण्याचे ठरविले आहे. याबाबतचा सदस्य प्रस्ताव स्थायी समितीत 27 नोव्हेंबर 2019 रोजी पारित करण्यात आला आहे. या ठरावावरुन भाजप नगरसेवकांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. या ठरावावरुन महासभा वारंवार लांबणीवर टाकली जात आहे. त्याचीच पुनरावृत्ती आज पुन्हा झाली.
विषयपत्रिकेवर पहिल्याच क्रमांकाला हा विषय होता. भाजपच्या पार्टी मिटींगमध्ये हा प्रस्ताव तहकूब करण्याचे ठरले होते. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी तसा व्हीप देखील नगरसेवकांना बजाविला होता. भाजप नगरसेवक सागर अंगोळकर यांनी खासगी वाटाघाटीद्वारे भू-संपादनाचा विषय वाचला. त्याला अंबरनाथ कांबळे यांनी अनुमोदन देताच महापौर ढोरे यांनी सभा तहकूब केल्याचे सांगितले. या विषयावर चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी भाजपासह विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी केली व तहकुबीला आक्षेप घेतला. मात्र महापौरांनी कोणालाही बोलू न देण्याची भूमिका घेतली. यामुळे भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी महापौरांसमोर धाव घेतली. राजदंड पळविण्याचा प्रयत्न केल्या. त्यानंतर कोणतीही सूचना आणि अनुमोदन न करताच महापौर निघून गेल्या.
त्यानंतर काही वेळाने नगरसचिव उल्हास जगताप यांनी महापौरांनी महासभा तहकूब केली आहे. पुढील सभेची तारीख नंतर कळविली जाईल, असे नगरसेवकांना सांगितले. त्याला राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांनी हरकत घेतली. कोणत्या नियमाच्या आधारे सभा तहकूब केली आहे. भाजपकडून मनमानी पद्धतीने, चुकीच्या पद्धतीने, नियमाला तिलांजली देत सभेचे कामकाज केले जात असल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजप नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी नगरसेवकांना सभा तहकूब झाली असून सभागृहाबाहेर येण्याचे आवाहन केले. त्यानंतर देखील राष्ट्रवादी, शिवसेनेचे नगरसेवक, नगरसेविका सभागृहात बसून होत्या.
तब्बल अर्धा तासानंतर महापौर ढोरे सभागृहात परत आल्या. त्यांनी आजची महासभा शुक्रवार (दि. 10) दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब केल्याचे जाहीर केले. दुसऱ्यावेळी देखील कोणीतीही सूचना न मांडता महापौरांनी सभेचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब केले. महापौर ढोरे यांची पहिली सभा तहकूब झाली होती. कामकाजाची आजची त्यांची सभा देखील गोंधळातच तहकूब झाली.