पुणे – पत्नीवर संशय घेऊन बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावल्याप्रकरणात सासरा, सासू व नणंदेला न्यायालयाने अंतरिम अटकपुर्व जामीन मंजूर केला. विशेष न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला. याप्रकरणात अंतरिम अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी तिघांनी ऍड. सुदीप केंजळकर यांमार्फत न्यायालयात अर्ज केला.
चिंचवड येथे दोन जुलै 2018 ते 30 ऑगस्ट 2021 या कालावधीत ही घटना घडली. पतीच्या बहिणीच्या नवऱ्यानेच जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचे कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या प्रकरणी 28 वर्षीय महिलेने चिंचवड पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीडितेचा नवरा, सासरा, सासू, नणंद आणि नणंदेच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार, विवाहितेचा छळ, धमकाविणेसह विविध कलमाने हा गुन्हा दाखल आहे.
त्यापैकी पती आणि नणंदेच्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना अंतरिम अटकपूर्व मंजुर करण्यात आला आहे. पोलिसांना तपासास सहकार्य करावे तसेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडू नये आदी अटी-शर्ती प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे. दरम्यान पीडितेचा पती आणि नणंदेच्या नवऱ्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.