दखल | महाराष्ट्रात समांतर सरकार?

स्वप्निल श्रोत्री
राज्यपाल आणि राज्य सरकार हे राज्याच्या विकासाचे दोन प्रमुख स्तंभ. त्यांच्यात समन्वय, सलोख्याचे नाते असावे. एकमेकांशी लढण्यात आपली शक्ती खर्ची करण्यापेक्षा एकत्र काम करावे.
लोकशाहीप्रधान राष्ट्रात लोकशाहीचे न्यायव्यवस्था, संसद आणि कार्यकारी विभाग असे तीन स्तंभ सांगितले जातात. भारतात ज्या पद्धतीची केंद्रात लोकशाही आहे त्याच पद्धतीची लोकशाही राज्यातसुद्धा आहे. न्यायव्यवस्था, कार्यकारी विभाग आणि विधिमंडळ राज्यातसुद्धा आपल्या कार्यक्षेत्रात सक्रिय असतात. राज्यातील कार्यकारी विभाग पाहिला तर त्यात राज्यपाल,
मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. भारतीय संविधानाच्या भाग 6 मधील कलम 153 ते कलम 167 हे राज्यातील कार्यकारी विभागाशी संबंधित असून संविधानाने या सर्वांना आपले अधिकार, कर्तव्य आणि मर्यादा ठरवून दिल्या आहेत. त्यामुळे या सर्वांनी आपल्या अधिकाराच्या मर्यादेत राहूनच काम करणे कायद्यानुसार अपेक्षित आहे.
परंतु, मागील काही वर्षांचा अभ्यास केला तर बऱ्याच वेळा राज्यपाल हे ज्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे सरकार आहे त्या राज्यात आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करताना दिसतात. परिणामी, अनेक राज्यांमध्ये राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा वाद उद्भवल्याचे चित्र अनेक वेळा जनतेसमोर येते.
महाराष्ट्रही या परिस्थितीस अपवाद नाही. महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्य सरकार यांच्यातील वाद हा दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे. राज्य सरकारच्या कामातील राज्यपालांचा वाढता हस्तक्षेप आणि जाणूनबुजून राज्य सरकारची अडवणूक राज्यपाल करीत असल्याचा आरोप राज्य सरकारकडून अनेक वेळा करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात महापुराने थैमान घातल्यानंतर पूरग्रस्त भागातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे केले. वास्तविक पाहता, भारतीय संविधानाच्या परिशिष्ट 7 अनुसार “आपत्ती व्यवस्थापन’ हा विषय राज्य सरकारच्या अंतर्गत येतो. राज्याच्या कोणत्याही भागांत आपत्ती आली तर आपत्ती व्यवस्थापनाची प्रथम जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्याची असते.
त्यामुळे महाराष्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यांचे दौरे करून आपत्ती निवारणाचे व्यवस्थापन ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने पूरग्रस्त जिल्ह्यांचे दौरे केले तर त्यात काही गैर नाही; परंतु राज्य सरकारला अडचणीत आणण्यासाठी किंवा राज्य सरकार नाकर्ते आहे असा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यपालांनी ज्या पद्धतीने पूरग्रस्त भागाचे दौरे केले ते संपूर्णपणे अनैतिक होते.
मुळात राज्यपाल हा केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधील दुवा आहे. राज्य सरकारला गरज असेल तेव्हा केंद्राकडून मदत मिळवून देणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. परंतु महाराष्ट्राला करोनाच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा ऑक्सिजन आणि वैद्यकीय सुविधा यांची गरज होती त्यावेळेस राज्यपालांनी आपले हात हलविले नाहीत उलट राज्य सरकार आपल्या कृतीमुळे कसे अडचणीत येईल यासाठी प्रयत्न केल्याचे गेल्या दोन वर्षांत अनेक वेळा दिसून आले आहे.
राज्यपाल हा राज्याचा मुख्य कार्यकारी असतो. परंतु, राज्याचा सर्व कारभार हा राज्यपालांच्या नावाखाली मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून चालविला जावा असे भारतीय संविधानाच्या कलम 163 मध्ये म्हटले आहे. म्हणजेच जोपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट (कलम 356) लागू होत नाही किंवा देशात राष्ट्रीय आणीबाणी (कलम 352) किंवा आर्थिक आणीबाणी
(कलम 360) जाहीर होत नाही तोपर्यंत राज्याचे कार्यकारी अधिकार हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडेच राहतात. (याला अपवाद म्हणजे काही विशेष राज्ये सोडली तर केंद्रशासित प्रदेशातील नायब राज्यपाल व जेथे प्रशासक नेमला आहे ती राज्ये किंवा तो प्रदेश)
केंद्र आणि राज्य संबंधांचा अभ्यास करण्यासाठी देशात यापूर्वी न्या. रंजित सिंह सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली सरकारिया आयोग (सन 1983) आणि न्या. मदन मोहन पंछी यांच्या अध्यक्षतेखाली पुंछी आयोग (सन 1989) मध्ये निर्माण केले गेले. दोन्ही आयोगांनी आपल्या अहवालात अनेक गोष्टी बोलल्या असल्या तरी त्यातील एक महत्त्वाची समान गोष्ट अशी होती की,
राज्यपाल हे पद बिगर राजकीय व्यक्तीलाच देण्यात यावे किंवा राजकीय व्यक्तीलाच द्यायचे असेल तर कमीत कमी ती व्यक्ती सक्रिय राजकारणापासून व कोणत्याही प्रकारच्या राजकीय कार्यक्रमांपासून कमीत कमी 3 वर्षे दूर असली पाहिजे.
विद्यमान राज्य सरकार हे जरी राज्यपालांच्या पक्षाच्या विरोधी पक्षाचे सरकार असले तरी ते लोकनियुक्त सरकार आहे हे राज्यपाल कोश्यारींना समजणे गरजेचे आहे शिवाय राज्य सरकारच्या निर्णयाचा व कामकाजाचा पूर्ण आदर हा राजभवनातून होणे घटनेनुसार अपेक्षित आहे.
तसेच राज्यपाल कोश्यारी यांच्यावर टीका करताना आपण राज्याच्या घटनात्मक प्रमुख असलेल्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत याचे भानसुद्धा सत्ताधारी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी बाळगले पाहिजे.





