दखल – हवामान बदल : राजकीय इच्छाशक्‍तीची गरज

अशोक सुतार

इंग्लंडची राजधानी लंडन येथे 16 वर्षीय मुलीच्या नेतृत्वाखाली हवामान बदलाविरोधात आंदोलन सुरू आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला जगभरातून पर्यावरणवाद्यांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक हवामान बदलाची चर्चा सुरू झाली आहे. स्वीडनमधील अवघ्या 16 वर्षांची पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्गन हिने हे आंदोलन सुरू केले आहे.

ग्रेटाने सुरू केलेल्या आंदोलनामुळे जगभरात ती पर्यावरणवाद्यांसाठी प्रेरणा ठरली आहे. 21 एप्रिल रोजी झालेल्या या आंदोलनात 963 लोकांना तेथील सरकारने अटक केली आहे. लंडनमध्ये गेली काही दिवस हवामान बदलाविरोधात मोठी चळवळ सुरू आहे. ही चळवळ पर्यावरण ऱ्हासाचा विद्रोह म्हणजेच एक्‍सटिंक्‍शन रिबेलिन या नावाने सुरू आहे.

जैवविविधतेचा ऱ्हास थांबवावा, मनुष्य प्रजाती विलुप्त होण्यापासून वाचवली जावी, जैवविविधता नष्ट होण्यापासून वाचवली जावी, अशा मागण्या पुढे ठेवत हे अहिंसक आंदोलन सुरू आहे. राज्यकर्त्यांनी हवामान बदलाचे सत्य सांगावे, कार्बनचे उत्सर्जन 2025 पर्यंत शून्य व्हावे, यावर लक्ष ठेवण्यासाठी नागरिकांची समिती असावी अशा विविध मागण्या सदर आंदोलकांनी केल्या आहेत. आंदोलकांनी आता एक आठवड्याचा कार्यक्रम जाहीर केला असून खासदारांना संसदेत जाण्यापासून रोखले जाणार आहे. मार्बल आर्च येथे आंदोलकांसमोर ग्रेटाने भाषण केले. या रॅलीत हजारो लोक सहभागी झाले होते.

जागतिक तापमानवाढीचे आव्हान जगासमोर उभे आहे. तंत्रज्ञानाच्या वापराने जीवन सुसह्य झाले असले तरी भविष्यात त्याचे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्‍यता आहे. मनुष्याप्रमाणेच नैसर्गिक साधनसंपत्ती, वन्यजीव, जलचर आदींना प्रदूषणाचा सामना करावा लागणार आहे. जागतिक तापमानवाढीचे मुख्य कारण आहे, कार्बन वस्तूंची निर्मिती. जगात वाढत्या औद्योगिकीकरणानंतर हवेत घातक वायू तयार होत असून श्‍वसनाचे रोग वाढत आहेत. हवेतील कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टी धोक्‍यात आली आहे. फेरप्रक्रिया हा कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा योग्य प्रकार असला तरी जीवसृष्टीत वाढत असलेले बेसुमार प्रदूषण मानवी आरोग्यास हानिकारक झाले आहे. वातावरणात ओझोनचा थर कमी होत असून सूर्याची अतिनील किरणे पृथ्वीवर थेट पडत असल्याने पृथ्वीचे तापमान वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे निसर्गचक्रात बदल होत आहे. पाऊसमानही बदलले असून केव्हाही महापूर येऊ शकतो अशी स्थिती आहे. ध्रुवीय प्रदेशात वाढत्या तापमानामुळे हिमनग वितळत आहेत.

हिमनग वितळल्यामुळे तेथील पाणी नद्यांमध्ये मिसळत असून समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. परिणामी समुद्री जीव, आजूबाजूच्या वातावरणातील सजीवांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचा बेसुमार वापर, मोबाइल, संगणकाचा अवास्तव वापर यांमुळे हवेत किरणोत्सर्गाचे प्रमाण वाढत आहे. हवेतील मोबाइलच्या लहरींचे परस्पर छेदन झाल्याने वातावरण गरम होत आहे. त्यामुळे इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचा वापर योग्य करणे अपेक्षित आहे. वृक्ष लागवड करणे, संवर्धन करणे, पाण्याचा योग्य तो वापर केला तर पृथ्वीचे वातावरण आटोक्‍यात येईल. हल्ली प्रत्येकाची स्वतंत्र वाहने आहेत. या वाहनांच्या अतिवापरामुळे हवेत कार्बन मोनोक्‍साईडचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय लोकांनी स्वीकारणे गरजेचे आहे. पृथ्वीवरील तापमान वाढ कमी करण्यासाठी सौरऊर्जा, पवनऊर्जा वापरली पाहिजे. औष्णिकऊर्जा टाळली पाहिजे. तापमानवाढ कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गतवर्षी आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पर्यावरण रक्षण, तापमानवाढ रोखण्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने काम करण्याची गरज आहे.

झपाट्याने होणारे शहरीकरण आणि वाढते प्रदूषण यांचा परिणाम मनुष्य जीवनावर होत आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी टाकाऊतून टिकाऊची आणि पुनर्निर्मिती-फेरवापराची संकल्पना अंगीकारावी लागणार आहे. यंदा महाराष्ट्रातील 26 जिल्ह्यांतील आणि 151 तालुक्‍यांत दुष्काळ आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ यांचा राज्यातील दुष्काळाशी, शेतकऱ्यांच्या परिस्थितीशी काही संबंध असू शकेल का? याचा अभ्यास सेंट्रल ड्रायलॅंड फार्मिंग या संस्थेने केला होता. भारतीय शेतीवर हवामान बदलाचा आणि जागतिक तापमान वाढीचा काय परिणाम होईल, हे दर्शवणारा अभ्यास 2013 मध्ये झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील 17 जिल्हे हवामान बदलासाठी असुरक्षित आणि अतिअसुरक्षित असल्याचे म्हटले आहे. देशातील 572 ग्रामीण जिल्ह्यांचा यात अभ्यास करण्यात आला आहे. या अहवालात अतिसुरक्षित जिल्ह्यांत सोलापूर, बीड, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, नंदूरबार, सांगली, बुलडाणा, धुळे, नाशिक, जालना, अमरावती हे जिल्हे येतात तर असुरक्षित जिल्हांत अकोला, औरंगाबाद, जळगाव, परभणी आणि वाशिम यांचा समावेश आहे. यादीत असलेल्या सोलापूर, अहमदनगर, बुलडाणा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना जास्त दुष्काळी दिवसांना तोंड द्यावे लागेल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 2050 पर्यंत देशातील तापमान वाढ 1 ते 4 डिग्री असेल. यामुळे दुष्काळ, वादळे आणि पूर यांची वारंवारता वाढेल. हवामानाला संवेदनशील असलेल्या शेती, जंगल, किनारपट्टीचा भाग, पाण्याची उपलब्धता आणि मानवी आरोग्य यावर विपरीत परिणाम होतील. राज्यातील शेतीवर आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर हवामान बदल आणि तापमान वाढ यांचा प्रभाव पडेल, असा दावा पर्यावरण तज्ज्ञांचा आहे.

नैसर्गिक ग्रीनहाऊस परिणामाबरोबरच औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातून उत्पन्न होणाऱ्या वायूंचे उत्सर्जन होत असते. त्यामुळे पृथ्वीच्या तापमानात वाढ होते. यालाच जागतिक तापमानवाढ म्हणतात. वातावरणाच्या थरांवर सूर्यकिरणे पडतात. वातावरणाचे थर सूर्यकिरणांना शोषून घेतात किंवा ते उत्सर्जित होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणारी सूर्यकिरणे हरितगृह वायू शोषून घेतात किंवा पुन्हा उत्सर्जित करतात. याच सौरऊर्जेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग आणि वातावरण तापते. इंधनाच्या ज्वलनातून आणि जंगलतोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्‍साईडचे प्रमाण वाढते. परिणामी तापमानवाढ होत आहे. तापमानवाढीमुळे होणारी समुद्राची वाढती पातळी, समुद्राची वाढती आम्लता आणि हिमनद्यांचे विरघळणे हे प्रकार अटळ आहेत. जागतिक हवामान बदल रोखण्यासाठी राजकीय इच्छाशक्‍तीची आणि परिस्थितीचे गांभीर्य नव्याने समजून घेऊन प्रत्येकाने तसे वर्तन करण्याची गरज आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.