– आरिफ शेख
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकताच भूतान दौरा केला. या भेटीचा उद्देश दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणे हा होता. चीनचा मात्र जळफळाट झाला आहे.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकताच भूतान दौरा केला. या भेटीचा उद्देश दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणे हा होता. चीनचा मात्र जळफळाट झाला आहे. भारतीय लष्करप्रमुखांची भेट भारत आणि भूतानमधील संबंध अधिक दृढ करणारी आहे. शेजार्याशी असलेले महत्त्व दर्शविणारी ही भेट आहे. भारत आणि भूतानमध्ये दीर्घकालीन द्विपक्षीय संबंध आहेत. परस्पर विश्वास, सद्भावनेवर ते आधारित आहेत. या दोन देशांत औपचारिक राजनैतिक संबंध 1968 मध्ये स्थापन झाले. भूतान हा व्यूहात्मक दृष्टिकोनातून भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. चीनची त्यावर वाकडी नजर आहे. त्याच वेळी, ड्रॅगनच्या प्रत्येक कटाला हाणून पाडण्यासाठी भारत भूतानशी आपली मैत्री सतत मजबूत करत आहे.
उभय देशांचे वरिष्ठ नेते परस्परांच्या देशांना भेटी देत असतात. भूतानच्या पंतप्रधानांनी डिसेंबर 2018 मध्ये भारताचा दौरा केला आणि नंतर 2019 मध्ये मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी ते आले होते. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी जून 2019 मध्ये भूतानला भेट दिली, पदभार स्वीकारल्या नंतर त्यांचा पहिला परराष्ट्र दौरा होता. भूतानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी 17 ते 23 नोव्हेंबर 2019 दरम्यान भारताला भेट दिली. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी 28 ते 29 फेब्रुवारी 2020 दरम्यान भूतानला भेट दिली. एस जयशंकर यांनी पुन्हा 2022 दरम्यान भूतानला भेट दिली.
आता जनरल द्विवेदी यांनी भूतान दौर्यात भारतीय दूतावासातील वरिष्ठ अधिकारी, तेथील भारतीय लष्करी प्रशिक्षण पथक आणि बॉर्डर रोडच्या अधिकार्यांशी संवाद साधला. लष्करप्रमुखांचा भूतान दौरा अशा वेळी झाला, जेव्हा चीन डोकलाममध्ये लष्करी पायाभूत सुविधा मजबूत करत आहे. 2017 मध्ये, डोकलाममध्ये भारतीय आणि चिनी सैन्य 73 दिवस आमनेसामने होते. या भेटीदरम्यान, लष्करप्रमुखांनी भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेतली आणि ‘रॉयल भूतान आर्मी’चे अधिकारी लेफ्टनंट जनरल बटू त्शेरिंग यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली.
लष्कराचे प्रवक्ते कर्नल निशांत अरविंद यांच्या म्हणण्यानुसार, भारत हा भूतान आणि चीनमधील सीमावाद सोडविण्यासाठी त्यांच्या सीमाविषयक चर्चेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्यात पश्चिमेकडील डोकलाम आणि उत्तरेकडील जकारलुंग आणि पासमलुंग खोर्यांचा समावेश आहे. जनरल द्विवेदी यांच्या भूतानी प्रतिनिधीशी झालेल्या चर्चेत डोकलाममधील एकूण परिस्थिती आणि या प्रदेशातील चिनी कारवाया यावरही चर्चा झाली.
गेल्या काही वर्षांत भारत आणि भूतानमधील संबंधांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. डोकलाम हा भारताच्या धोरणात्मक हितासाठी एक महत्त्वाचा भाग मानला जातो. डोकलाम ट्राय-जंक्शनवरील संघर्ष 2017 मध्ये सुरू झाला, जेव्हा चीनने या भागात रस्ते बांधण्याचा प्रयत्न केला. भारताने या बांधकामाला जोरदार विरोध केला होता. कारण त्यामुळे त्याच्या एकूण सुरक्षाविषयक हितसंबंधांवर परिणाम झाला असता. अनेक फेर्यांच्या चर्चेनंतर हा संघर्ष मिटला. भूतानची चीन बरोबर चारशे किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची सीमा आहे आणि दोन्ही देशांनी हा वाद सोडवण्यासाठी अनेकदा चर्चा केल्या आहेत.
2023 च्या अखेरीस, भूतानचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री टांडी दोर्जी यांनी बीजिंगमध्ये त्यांचे चिनी समकक्ष वांग यी यांच्याशी चर्चा केली. चीनने म्हटले होते की, भूतान सीमा प्रश्नाचे लवकर निराकरण करण्यासाठी चीनसोबत काम करण्यास तयार आहे. भूतान आणि चीनमध्ये सुरू असलेल्या चर्चेवर भारत बारकाईने लक्ष ठेवून आहे. भूतान लष्कराचे चीफ ऑपरेशन्स ऑफिसर लेफ्टनंट जनरल यांनी फेब्रुवारीमध्ये भारताचा दौरा केला. या दरम्यान त्यांनी जनरल द्विवेदी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्याशी चर्चा केली होती. चीनची नजर भूतानच्या भूमीवर आहे. चीन भूतानमध्ये सतत गावे वसवत असताना, भारताने पुन्हा एकदा भूतानशी असलेल्या मजबूत संबंधांचा संदेश या दौर्यातून दिला.
1950 पासून चीन आणि भूतानमध्ये 477 किलोमीटर लांबीच्या सीमेवरून वाद सुरू आहे. येथे दोन क्षेत्रांवर सर्वाधिक वाद आहे, त्यापैकी एक म्हणजे 269 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेला डोकलाम परिसर. दुसरा भाग म्हणजे भूतानच्या उत्तरेकडील 495 चौरस किलोमीटर जकारलुंग आणि पासमलुंग खोरे. गेल्या आठ वर्षांत, ड्रॅगनने भूतानच्या भूमीत वारंवार घुसखोरी केली आहे आणि 20 हून अधिक गावे वसवली आहेत. चीनने डोकलाममध्येच आठ नवीन गावे वसवली आहेत. याशिवाय भूतानच्या उत्तरेकडील प्रदेशातील जकारलुंग आणि पासमलुंग खोर्यांवरूनही चीन वाद निर्माण करत आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये चीन आणि भूतानने तीन-टप्प्यांचा रोडमॅप करार केला. आतापर्यंत दोन्ही देशांमध्ये सीमाविषयक चर्चेच्या 25 फेर्या झाल्या आहेत. भूतान सैन्यालाही धमकावण्याचा प्रयत्न चीनने अलीकडेच केला होता. त्यावरून एक नवीन वाद सुरू आहे. अरुणाचल प्रदेशच्या तवांग सीमेजवळ भूतानच्या पूर्वेला साक्तेंग वन्यजीव अभयारण्य आहे.
2020 मध्ये झालेल्या जागतिक पर्यावरण बैठकीत चीननेही यावर आपला दावा सांगितला होता. तथापि, भूतानने तो पूर्णपणे नाकारला. चीनची सीमा साक्तेंग अभयारण्यापासून जात नाही, तरीही तो त्यावर दावा करत आहे. चीन दृष्टीने हा भाग वादग्रस्त आहे. चीनची ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ (पीएलए) आता रॉयल भूतान आर्मी (आरबीए)ला त्यांच्या भूमीवर गस्त घालण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. डोकलामजवळील अमो-छू नदीच्या काठावर भूतान सैनिकांना रोखण्यात आले. हे प्रकरण इतके वाढले, की फेब्रुवारीमध्ये दोन्ही सैन्यांमध्ये फ्लॅग मीटिंग आयोजित करावी लागली. चीन हा मेंढपाळांच्या माध्यमातून युक्त्या खेळत आहे. चीनने मेंढपाळांच्या बहाण्याने लडाखमधील जमीन ताब्यात घेण्याची युक्ती आधीच खेळली होती. आता भूतानमध्येही तेच घडत आहे.
गुप्तचर अहवालानुसार, चिनी मेंढपाळांनी तिबेट-भूतान सीमेवरील कुरणांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. भूतान सैन्याने त्यांना रोखले, त्यावर चीनने आक्षेप घेतला आणि तिबेटी मेंढपाळांना चिनी मेंढपाळ ठरविले. भारत आणि भूतानमधील संबंध हे मैत्री, सहकार्य आणि विश्वासावर आधारित आहे. भूतानचे लष्करी प्रशिक्षण भारतीय लष्करी संस्थांमध्ये होते. भारत हा भूतानच्या व्यापार आणि विकासातही भागीदार आहे. जनरल उपेंद्र द्विवेदी यांची ही भेट केवळ राजनैतिकच नाही, तर एक धोरणात्मक संदेशदेखील आहे, की भारत प्रत्येक आव्हानात त्याच्या शेजारी भूतानसोबत उभा आहे आणि डोकलामसारखी घटना पुन्हा घडू देणार नाही.