– श्रीनिवास औंधकर
इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी ‘भारतीयांना 2040 पर्यंत चंद्रावर उतरवण्याचे’ ध्येय असल्याचे नुकतेच सांगितले आहे. त्यासाठी अवकाश स्थानक उभारणेही गरजेचे आहे.
भारतीय अवकाश संशोधन केंद्र म्हणजेच इस्रो हा भारताचा मानबिंदू असून भारतीयांसाठी अभिमान वाटणारी संस्था आहे. ‘इस्रो’ची स्थापना 1962 मध्ये झाली. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्याच्या भविष्यात अवकाश मोहिमांत भारताचा सहभाग उत्तरोत्तर वाढत जाईल, असे स्वप्न पाहिले होते. महान शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्यावर अंतराळ संशोधन कार्यक्रमाची धुरा सोपविण्यात आली.
यानुसार भारतीय राष्ट्रीय अवकाश संशोधन समितीची स्थापना झाली. कालोघात तिचे कार्यक्षेत्र वाढत गेले आणि तिची जागा ‘इस्रो’ संस्थेने घेतली. अवकाश क्षेत्रात संशोधनात आघाडी घेणार्या या संस्थेने गेल्या तीन-चार दशकांत एकाहून एक सरस कामगिरी केली आहे. सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपुरी साधने असूनही अत्यंत कमी खर्चात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या बळावर या संस्थेने जगातील नामांकित अवकाश संस्थेशी स्पर्धा केली आहे.
एकवेळ जेव्हा साधनांची कमतरता होती तेव्हा रॉकेटला बैलगाडीने नेले जात होते. भारतीय शास्त्रज्ञ दररोज दुपारचे जेवण रेल्वे स्थानकानावर घेत असत. पण आता ‘इस्रो’ने देश आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी विकसित केल्या जाणार्या अवकाश विज्ञानाला नवी ओळख दिली आहे. ‘इस्रो’कडे दळणवळण उपग्रहांचा संच असून आगामी काळात देशातीलच नाही तर जगभरातील गरजू देशांच्या दळणवळणाची गरज भागविण्याचे काम करत आहे.
प्रसारण, दळणवळण, हवामानाचा अंदाज, आपत्ती व्यवस्थापन उपकरण, भौगोलिक माहिती व्यवस्था, जलवाहतूक आदी गोष्टींसाठी ‘इस्रो’चे विशेष उपग्रह सेवा प्रदान करताहेत. वास्तविक दिवसेंदिवस उपग्रहांची उपयुक्तता वाढत असल्याने विश्वसनीय आणि प्रणाली विकसित करणे भारतासाठी गरजेचे होते. यानुसार भारताने या क्षेत्रात आत्मनिर्भर होत ‘पीएसएलव्ही’ रॉकेटचा विकास झाला.
प्रतिष्ठित ‘पीएसएलव्ही’ हा विविध देशाच्या उपग्रहांचा सर्वाधिक सुलभ प्रक्षेपक ठरला. विश्वसनीयता आणि उपयुक्ततेमुळे ‘पीएसएलव्ही’ला आंतरराष्ट्रीय पाठबळही वाढले. ‘इस्रो’च्या चांद्रयान-1 आणि चांद्रयान-3 चे यशस्वी उड्डाण हे संंपूर्ण जगाला अचंबित करणारे ठरलेे. इस्रो जागतिक पातळीवरची शक्तिशाली अवकाश संशोधन संस्था होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. इस्रोला मिळणारे यश हे प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे.
आता भारताने अवकाश मोहिमांच्या तारखांची घोषणा केली. ‘इस्रो’चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी मानवी अवकाश मोहीम गगनयान 2026 मध्ये सुरू होण्याची शक्यता वर्तविली. त्याचबरोबर चंद्रावरून नमुने आणण्यासाठी 2028 मध्ये चांद्रयान-4 अवकाशात झेपावणार आहे. भारत आणि अमेरिकेची ही संयुक्त मोहीम 2025 मध्ये कार्यान्वित होईल; तर चांद्रयान मोहीम-5 ही जपानच्या अवकाश संस्थेंसह तडीस नेली जाईल.
चांद्रयान-5 च्या माध्यमातून पाठविण्यात येणारा रोव्हर हा 350 किलोचा असेल. 2040 पर्यंत चंद्रावर माणूस पाठविण्याची ‘इस्रो’ची योजना आहे. वास्तविक, इस्रोच्या प्लॅनिंग कमिटीकडून मानवी अंतरिक्ष मोहिमेला 2004 मध्येच मान्यता देण्यात आली होती आणि तेव्हापासूनच अशा मिशनची तयारी सुरू झाली होती. सप्टेंबर महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने चार महत्त्वाच्या अंतराळ मोहिमांना मंजुरी दिली. यामध्ये चांद्रयान-4, व्हीनस ऑर्बिटर मिशन, भारतीय अंतरिक्ष स्टेशनची निर्मिती आणि गगनयान यांचा समावेश होता.
या मोहिमांचा उद्देश अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानामध्ये भारताच्या स्थानाला चालना देणे, आपल्या अंतराळ क्षमता वाढविण्याच्या आणि जागतिक अवकाश संशोधन प्रयत्नांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी देशाचे समर्पण अधोरेखित करणे आहे. गेल्या काही वर्षांत इस्रोने देदीप्यमान यश मिळवले असले, तरी काही आव्हाने देखील आहेत.
प्रक्षेपक उच्च तंत्रज्ञानयुक्त करणे, अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करणे, जीवरक्षक प्रणाली विकसित करणे आणि उच्च प्रतीच्या स्पेस सूटचा विकास करणे याबाबत आपल्याकडील शास्त्रज्ञ सातत्याने काम करत आहेत. भारताच्या अवकाश क्षेत्राची अजूनही व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. कारण जागतिक पातळीवर अवकाश क्षेत्रात ‘इस्रो’चे योगदान केवळ दोनच टक्के आहे. एका दशकात तो वाढवून किमान 10 टक्के करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
विशेष म्हणजे आता खासगी क्षेत्रही अवकाश क्षेत्रात गुंतवणूक करण्यात रुची दाखवत आहेत. अनेक गोष्टी पारंपरिक रूपाने आतापर्यंत केवळ इस्रोकडून केल्या जात होत्या, पण त्या आता खासगी माध्यमातूनही पूर्ण केल्या जात आहेत. त्यामुळे खासगी क्षेत्राचा सहभाग वाढविण्यासाठी नवे धोरण आणण्याची गरज आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा ‘इस्रो’शी निकटचा संबंध राहिला आहे आणि त्यांनी भारताचा अवकाश कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकासात महत्त्वाची भूमिका बजावली.
भारताचा पहिला स्वदेशी प्रक्षेपण यान एलएलव्ही-3, पृथ्वी, अग्नि, त्रिशूळ, नाग आणि आकाश यांसारख्या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांची त्यांनी निर्मिती केली. तसेच चांद्रयान-1 चे देखील नेतृत्व केले होते. आज ‘इस्रो’कडे शास्त्रज्ञांची मोठी टीम आहे आणि अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे नेतृत्व महिला शास्त्रज्ञ करत आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक सार्वजनिक उपक्रम अपयशी ठरले गेले, मात्र ‘इस्रो’ने अवकाश क्षेत्रात भारताचा दबदबा वाढविला आहे. ‘इस्रो’चे महत्त्व अमेरिकी अवकाश संस्था ‘नासा’ देखील नाकारत नाही.
नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर उतरलेला पहिला मानव. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच तो म्हणाला होता, की हे मानवाचे एक छोटेसे पाऊल आहे; मात्र मानवतेचा खूप मोठा प्रवास आहे. आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला त्या अवतरक (लॅन्डर) यानाचं नाव ‘इगल’ असं होतं आणि माणसाच्या दृष्टीने अंतराळातली ती खरोखरची गरूडझेप होती. त्यानंतर अनेक चांद्रवीर चंद्रावर जाऊन आले.
मायकेल कॉलिन्सलाही ती संधी मिळाली. हे पहिले चांद्रवीर मुंबईत आले तेव्हा त्यांना पाहण्याची उत्सुकता अनुभवली होती. पृथ्वी सोडून अंतराळातल्या दुसर्या एखाद्या भूभागावर माणसाने जाण्याची ती पहिलीच वेळ होती. आजही चंद्र वगळता अंतराळातल्या अन्य भूप्रदेशात माणूस पोहोचलेला नाही. पण प्रगत अवकाश संशोधनाच्या युगात आणि जगभरात सुरू असलेल्या प्रयत्नांचा वेध घेता येणार्या भविष्यात अनेक अशक्य बाबी शक्यतेत उतरताना दिसतील. यामध्ये इस्रोचे योगदान मोलाचे राहील यात शंका नाही.