पुणे,वानवडी (उत्कर्ष खवले) -राज्याच्या नगरविकास विभागाने पुणे महापालिका निवडणुकीसाठी महापालिकांच्या प्रभागांची संख्या आणि प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तातडीने बनविण्याचे आदेश आयुक्तांना दिले. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक पुन्हा वाढू लागली आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले इच्छुक उमेदवार पुन्हा सक्रिय झाले आहेत.
सोशल मीडियावर मात्र एकमेकांच्या स्पर्धा सुरू झाल्या आहेत. मतदार याद्यामधील मतदार शोधून छुपा प्रचारही सुरू केला आहे. गटा- गटाने जेवणावळी, चहापानात वाढ झाली आहे. कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू केली जात आहे. घराघरात,गल्लीबोळात, भागा- भागात मतदारांचा विचार सुरू झाला आहे. त्यातच नवीन वर्षे जवळ आल्याने आपल्या विकासकामांचे व कार्यक्रमांचे फोटो कॅलेंडरमध्ये छापून वाटप सुरू केले आहे.
छोट्या- मोठ्या कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू केली जात आहे. इच्छुक उमेदवार आणि विद्यमान कारभारी हे व्होट बॅंक मजबूत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करीत आहेत. आपआपल्या भागातील छोट्या- मोठ्या कार्यक्रमांना विशेष हजेरी लावत आहेत.आपल्या प्रभागात आपण इच्छुक असल्याचे दाखविण्यासाठी आधारकार्ड, पॅन कार्ड, ई श्रम कार्ड, नवीन मतदार नोंदणी सुरू करून भागातील समस्यांचे निवेदन आयुक्तांना दिले जात आहे. या कामांतून इच्छुक उमेदवार हे आपली छबी झळकवत आहेत.
प्रभागातील इच्छुक आणि सक्रिय उमेदवार हे विकासकामांची प्रसिद्धी सोशल मीडियावर करीत आहेत. प्रभाग रचनेचे काम सुरू केल्याने इच्छुक मात्र पुन्हा एकदाचे अलर्ट झाले आहेत. प्रभागातील कामे आमदार, खासदार, मंत्री, मोठे नेते यांना दाखवून उमेदवारीसाठी आपणच योग्य असल्याचे वरिष्ठांच्या निर्दशनास आणूण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यात अनेक इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. प्रभाग रचनेचा कार्यक्रम सुरू झाल्याने वर्षभरापासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांमध्ये पुन्हा एकदा उत्साह सुरू झाला असल्याचे चित्र भागाभागातून दिसत आहे.
तीन वर्षांचा लेखाजोखा मांडणार
गेल्या तीन वर्षांपासून इच्छुक उमेदवार हे निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यात पाच वर्षांपूर्वी पक्षाने माघारी घ्यायला लावलेले भावी उमेदवार आहेत. पुढील वेळी नक्कीच विचार करू, अशी ग्वाही त्यावेळी दिलेले इच्छुक उमेदवार आता आर पारची लढाईसाठी मैदानात उतरण्याची रणनीती आखली आहे. तीन वर्षांपासून केलेली समाजसेवा, प्रभागातील समस्यांचे निराकारण करण्यासाठी केलेला पाठपुरावा, शासकीय कामांसाठी केलेले प्रयत्न आदींचा लेखाजोखा हे इच्छुक मांडणार आहेत. याचीही तयारी सुरू केली आहे. आपल्या प्रभागातील मतपेढी वाढविण्यावर त्यांचा भर दिसत आहे.