व्याजदर कमी पातळीवर हवेत

कामत : तरच बॅंकांचे अस्तित्व राहील अबाधित

नवी दिल्ली – व्याजदर सध्या कमी होत आहेत ही समाधानाची बाब आहे. बॅंकांच्या अस्तित्वासाठी दीर्घ पल्ल्यात व्याजदर कमी पातळीवर राहण्याची गरज आहे, असे ज्येष्ठ बॅंकर के. व्ही. कामत यांनी म्हटले आहे.

कामत हे न्यू डेव्हलपमेंट बॅंकेचे माजी अध्यक्ष आहेत. काही महिन्यांपासून बॅंकांचे व्याजदर कमी होत आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. हे व्याजदर आणखी कमी होण्याची गरज आहे. याअगोदर सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना सरकारने मोठ्या प्रमाणात भांडवली मदत केली आहे. आगामी काळातही अशी मदत लागेल. मात्र या मदतीचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत बरेच कमी असणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये बॅंकांनी आपली कार्यक्षमता वाढवून व्याजदर कमी पातळीवर ठेवण्याची गरज आहे. तरच भारतातील उद्योग जागतिक पातळीवर स्पर्धात्मक राहू शकतील, असे त्यांनी सूचित केले.

रिझर्व्ह बॅंकेने कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळे सध्याच्या परिस्थितीत बॅंका आणि कर्ज घेणाऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. रिझर्व्ह बॅंकेने कर्जाचा हप्ता पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी सर्वच कर्ज घेणाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला नाही ही अतिशय आनंदाची बाब आहे. बऱ्याच कर्ज घेतलेल्या कंपन्यांनी आणि नागरिकांनी वेळेवर हप्ते भरणे पसंत केले, असे ते म्हणाले.

स्टेट बॅंकेकडून व्याजदरात कपात
स्टेट बॅंक ऑफ इंडियाने बुधवारी अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरात कपात केली. बॅंकेने म्हटले आहे की, मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड आधारित व्याजदर म्हणजे एमसीएलआर कमी मुदतीच्या कर्जासाठी 10 जुलैपासून 0.05 ते 0.10 टक्‍क्‍यांनी ( 5 ते 10 बेसीस पॉईंट) कमी केले आहेत. ग्राहकांनी अल्प मुदतीचे कर्ज घेऊन खर्च वाढवावा, अशी या मागील भूमिका दिसून येते. आता या नव्या निर्णयानंतर बॅंकेचा तीन महिन्यांपर्यंतचा एमसीएलआर दर 6.65 टक्‍के इतका झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.