नवी दिल्ली – रिझर्व्ह बॅंकेने अपेक्षेप्रमाणे महागाई कमी करण्यासाठी रेपो या आपल्या मुख्य व्याजदरात 0.35% ची वाढ केली आहे. त्यामुळे बॅंका आता पुन्हा घरासाठीच्या कर्जावरील व्याजदरात त्या प्रमाणात वाढ करण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत घरांच्या मागणीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो असे विकसकांना वाटते.
रेपोदरात वाढ केली की बॅंका कर्जावरील व्याजदरात वाढ करतात. विकसकांनाही महाग कर्ज मिळू शकते. अशा परिस्थितीत घराच्या किमतीत काही प्रमाणात वाढ होऊ शकते.
काही महिन्यापासून घरांची विक्री वाढत होती. मात्र आता या घडामोडीमुळे किमान लघु पल्ल्यात घरांच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो असे क्रेडाई या संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पटोडिया यांनी सांगितले. ऍनॉरॉक या संस्थेचे अध्यक्ष अनुज पुरी यांनीही घराच्या मागणीवर काही प्रमाणात परिणाम संभवतो असे सांगितले.
टाटा रिऍल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे व्यवस्थापकीय संचालक संजय दत्त म्हणाले की, जरी व्याजदरात वाढ झाली तरी आगामी काळात रिऍल्टीक क्षेत्रात गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
मे महिन्यात घरासाठीच्या कर्जाचे व्याजदर 6.5% होते. ते आता 8.5% झाले आहे. त्यामध्ये पुन्हा 0.35% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. याचा कमी किमतीच्या घराच्या मागणीवर जास्त परिणाम संभवतो. मात्र जोपर्यंत व्याजदर 10% च्या आत आहेत तोपर्यंत घराच्या मागणीवर जास्त परिणाम होणार नाही असे काही विकसकांनी सांगितले.
रिझर्व बॅंकेतर्फे रेपो रेट मध्ये करण्यात आलेली वाढ ही अपेक्षितच होती. कोरोनानंतर बांधकाम क्षेत्रातील व्यवहारात वाढ झाली आहे. या क्षेत्राचा विकास यापुढेही कायम राहणार आहे. व्याजदर हे नेहमीच बदलत राहतात. सध्या रेपो रेट मध्ये वृद्धी झाली असली तरी, या क्षेत्रातील नवीन प्रकल्प आणि सकारात्मकता लक्षात घेत, नागरिकांनी गृहखरेदीचा आवश्य लाभ घेतला पाहिजे.
– अनिल फरांदे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो