मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने जूनच्या पहिल्या आठवड्यात व्याजदरात 0.40 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर इतर व्यवसायिक बॅंकांनी आपल्या कर्ज आणि ठेवीवरील व्याज दरात वाढ करणे चालूच ठेवले आहे.
खासगी क्षेत्रातील घरासाठी कर्ज देणाऱ्या एचडीएफसीने कर्जावरील व्याजदरात 0.05 टक्क्यची वाढ जाहीर केली आहे. यामुळे घरासाठी नव्याने आणि जूने कर्ज घेतलेल्या कर्जावरील व्याजदरात वाढ झाली आहे. एचडीएफसीने या महिन्यात तिसऱ्या वेळा व्याजदरात वाढ केली. एचडीएफसीने केलेली रिटेल प्राईम लॅंडिंग रेटमधील व्याजदर वाढ एक जून पासून लागू होणार आहे.
आता नवे व्याजदर 7.05 टक्के ते 7.50 टक्क्या दरम्यान राहणार आहेत. दरम्यान या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक होणार असून या बैठकीमध्ये रिझर्व्ह बॅंक पुन्हा व्याजदरात वाढ करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या व्याजदर वाढीच्या प्रमाणात इतर बॅंका आणि बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था आपल्या ठेवी आणि कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान सार्वजनिक क्षेत्रातील पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडस् बेस्ड लेंडिंग रेट मध्ये 0.15 टक्क्यांची वाढ केली आहे. ही वाढ सर्व कर्जासाठी असून या निर्णयाची अंमलबजावणी एक जून पासून करण्यात येणार असल्याचे पंजाब नॅशनल बॅंकेने शेअर बाजारांना कळविल्या माहितीत म्हटले आहे. पंजाब नॅशनल बॅंकेच्या या व्याज दरवाढीमुळे आता बॅंकेचा एमसीएलआर हा दर 7.25 टक्क्यावरून 7.40 टक्के इतका झाला आहे. यामुळे बॅंकेकडून घेतलेल्या कर्जावरील हप्त्याची रक्कम त्या प्रमाणात वाढणार असल्याचे दिसून येते.