बिग बॉस शिलेदार साधणार मतदारांशी संवाद

बिग बॉस शिलेदार साधणार मतदारांशी संवाद

पुणे – एरवी बिग बॉसच्या घरामध्ये वादळी कल्ला करणारे कलावंत कोथरूडमधील मतदारांशी मतदान जनजागृती संवाद साधणार आहेत. “व्होट अप कोथरूड’, या मोहिमेच्या माध्यमातून 17 आणि 18 ऑक्‍टोबरला ते कोथरूडमधील सोसायट्यांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

बिग बॉसच्या माध्यमातून तुफान लोकप्रियता मिळवलेले आरोह वेलणकर, नेहा शितोळे, मैथिली जावकर यांच्यासमवेत अक्षय टाकसाळे, पल्लवी पाटील, प्रसाद जावडे, निखिल राजेशिर्के आदी यामध्ये सहभागी होणार आहेत. या कलाकारांनी यापूर्वीच सोशल मीडियावरील व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या या आवाहन पर मोहिमेला प्रारंभ केला आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना आरोहने सांगितले की, एक कलावंत म्हणून नागरिकांचे आम्हाला अपार प्रेम मिळत असते. मात्र, सामाजिक उत्तरदायित्वाची भान म्हणून आम्ही आमच्या लोकप्रियतेचा फायदा करून कोणत्या विषयावर समाजजागृती करू शकत असू तर ती आमच्यासाठी समाधानाची बाब आहे.

शहरी भागातील सुशिक्षित मतदार मतदान करण्याबाबत निरुत्साही असतो, असा आरोप केला जातो. तसेच मतदान केले नाही तर पुढची 5 वर्षे आपल्याला लोकशाही आणि सरकार विषयक कोणते मत व्यक्‍त करण्याचा काय अधिकार, असाही प्रश्‍न उपस्थित करण्यात येतो. तसेच अपप्रचार आणि भूलथापांना बळी पडून मतदान केले जाते. या पार्श्‍वभूमीवर “विकसित कोथरूड, विकसित पुणे’ आणि विकसित महाराष्ट्रासाठी सजगपणे मतदान करण्याचे आवाहन यावेळी करणार असल्याचे कलावंतांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.