आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धा : पुणे जिल्हा महिला संघास विजेतेपद

पुणे – पुण्याच्या महिला संघाने वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटने (डब्ल्युआयएफए) तर्फे आयोजित केलेल्या आंतर जिल्हा फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात त्यांनी बुलढाणा संघाचा टायब्रेकरद्वारा 3-1 असा पराभव केला. पुण्याच्या सोनाली चिमटे हिला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला तर पुण्याची कर्णधार अंजली बारके हिला सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा मान मिळाला.

जळगांव येथील शिव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अंतिम सामन्यामध्ये पुणे आणि बुलढाणा संघांनी जोरदार खेळ केला. पावसात झालेल्या या सामन्यामध्ये दोन्ही संघाच्या खेळाडूंनी गोल करण्याच्या संधी गमावल्याने पूर्वार्धात गोलशून्य बरोबरी होती.

उत्तरार्धात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जोरदार चाली केल्या. धसमुसळा खेळ केल्याबद्दल पुण्याच्या सोनाली चिमटे (53 व्या मिनिटाला) आणि श्‍वेता बोरूडे (59 मिनिटाला) तर, बुलढाण्याच्या गुंजन रिसोडकर (56 मिनिट) यांना पिवळे कार्ड देण्यात आले. 72 व्या मिनिटाला बुलढाण्याच्या दिपशिका हिवाळे हिला चुकीच्या पध्दतीने चेंडू अडविल्याबद्दल पिवळे कार्ड देण्यात आले. पूर्णवेळ गोलफलक कोराच राहील्याने टायब्रेकरचा उपयोग करण्यात आला.

टायब्रेकरमध्ये बुलढाणा संघाकडून ऋषिका हिवाके हिने गोल मारला. पुणे संघाकडून म्युरल ऍडम, श्‍वेता बुगडे आणि सना शेख यांनी अचूक वेध घेतला. पुण्याची गोलरक्षक आणि कर्णधार अंजली बारके हिने दोन पेनल्टी अडवून संघाच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण जळगांव महानगरपालिका आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा क्रीडाधिकारी सुनंदा पाटील, वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेचे खजिनदार प्यारेलाल चौधरी, पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी यांच्या हस्ते झाला.

अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा मान बुलढाणा संघाच्या दिपीका हिवाळे हिने मिळवला. उत्कृष्ट बचावरक्षकाचा मान बुलढाण्याच्या निकीता जाधव हिला मिळाला. सर्वाधिक गोल मारण्याचा मान कोल्हापूरच्या प्रतिक्षा मिथाई हिला देण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.