क्रॉसकंट्री स्पर्धा : आकाश परदेशी व वृषाली उत्तेकर विजेते

पुणे – श्री शाहू विद्यामंदिरचा खेळाडू आकाश परदेशीने आंतर महाविद्यालयीन क्रॉसकंट्री स्पर्धेतील पुरूषांच्या गटात प्रथम स्थान घेतले. महिलांमध्ये अप्पासाहेब जेधे महाविलयाची खेळाडू वृषाली उत्तेकर विजेती ठरली. श्री शाहू मंदिर महाविद्यालयाने दोन्ही गटात सांघिक विजेतेपद पटकावित दुहेरी कामगिरी केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुणे शहर विभागीय क्रीडा समितीतर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुरूषांच्या गटात परदेशीने 10 किलोमीटरचे अंतर 30 मिनिटे 44.61 सेकंदात पार केले. सतीश कासले (एम.एम.सी.सी) याने 33 मिनिटे 26.51 सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करीत उपविजेतेपद मिळविले.

अजय गायकवाड (श्री शाहू मंदिर) याला तिसरा क्रमांक मिळाला. त्याला हे अंतर पार करण्यास 35 मिनिटे 35.29 सेकंद वेळ लागला. रुद्र थोपटे(मॉडर्न, शिवाजीनगर), रोहन थोरात (शासकीय अभियांत्रिकी) व सुज्वल नाईक (आबासाहेब गरवारे महाविद्यालय) यांनी अनुक्रमे 4 ते 6 क्रमांक घेतले. या गटात 14 संघांमधील 52 खेळाडूंनी भाग घेतला होता. श्री शाहू मंदिर महाविद्यालयास 31 गुण मिळाले. मॉडर्न गणेशखिंड व मॉडर्न शिवाजीनगर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.

महिलांमध्ये उत्तेकरने 10 किलोमीटर अंतर 35 मिनिटे 27.93 सेकंदात पूर्ण केले. यमुना लडकत (श्री शाहू मंदिर) हिने ही शर्यत 36 मिनिटे 18.38 सेकंदात पार करीत उपविजेतेपद मिळविले. स.प.महाविद्यालयाची खेळाडू प्रियांका चवरकरने तिसरे स्थान घेताना हे अंतर 36 मिनिटे 53.38 सेकंदात पूर्ण केले. परिणिता शेंडे (श्री शाहू मंदिर), स्नेहल यादव व संपदा बुचडे (दोन्ही सेंट मीराज) यांना अनुक्रमे 4 ते 6 क्रमांक मिळाले. या गटात 12 संघाच्या 36 खेळाडूंनी भाग घेतला.

श्री शाहू मंदिर संघास 29 गुण मिळाले. सेंट मीराज व स.प.महाविद्यालय यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान घेतले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दीपक माने व शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या क्रीडा संघटक गुरूबन्स कौर यांच्या हस्ते झाला. यावेळी डॉ. सुदाम शेळके व सुजीत मेढेकर उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)