बेतूल (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेश येथील बेतूल जिल्ह्यातील एका गावामध्ये मुलीने आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून नातेवाईकांनी तिच्या पतीच्या दुकानाला आग लावल्याची निंदनीय घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बेतूल जिल्ह्यातील एकाच गावामध्ये राहणाऱ्या २१ वर्षीय दलित युवकाने व १९ वर्षीय इतर मागासवर्गीय समाजाच्या (OBC) युवतीने प्रेमविवाह केला होता. मुलीच्या पालकांचा व इतर नातेवाईकांचा या आंतरजातीय विवाहास सुरुवातीपासूनच विरोध होता मात्र या विरोधाला झुगारत संबंधित युवक-युवती लग्नबंधनात अडकले.
मात्र मुलीचे नातेवाईक दलित युवकाशी लग्न केल्याचा राग मनात धरून होते. याच रागापोटी त्यांनी सदर मुलाच्या दुकानास आग लावली. या घटनेनंतर गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मुलीच्या २३ नातेवाईकांवर अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक कार्तिकेयन के यांनी दिली.
दरम्यान, बेतूल जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तेजस्वी नायक व पोलिस अधीक्षक कार्तिकेयन यांनी दोन्ही कुटुंबाची भेट घेतली असून त्यांना शांती राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गावात एक विशेष पोलीस तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे.