यापुढील प्रत्येक आंदोलने तीव्र करा – राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत कार्यकर्त्यांना आदेश

कोल्हापूर(प्रतिनिधी) – अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व संयुक्त किसान मोर्चेच्यावतीने सुरू असलेल्या देशभरातील आंदोलन यशस्वी करण्यासाठी केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी कायदे रद्द करण्याबरोबर राज्य सरकारने लाॅकडाऊनच्या काळातील तीन महिन्याचे घरगुती व शेती पंपाचे वीज बिल माफ करावे याकरिता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात रास्ता रोको, चक्का जाम , जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, ट्रॅक्टर मोर्चा यासारखे विविध आंदोलन करून 6 फेब्रुवारीच्या व यापुढील प्रत्येक आंदोलनाची तीव्रता वाढवावी असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक ( Swabhimani Shetkari Sanghatana ) अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांनी तुळजापूर येथील राज्य कार्यकारीणीमध्ये केले.

यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेटटी म्हणाले कि, केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील शेतकरी व सर्वसामान्य जनता भरडले जाणार असून या कायद्यामुळे कार्पोरेट क्षेत्रातील मुठभर लोकांनाच याचा लाभ होणार आहे. सरकारने शेतकरी विरोधी घोरणे राबिविण्याचा सपाटाच सुरू केला असून भविष्यात या धोरणामुळे देशातील शेतकरी हा मुठभर कार्पोरेट लोकांच्या दावणीला बांधलेला असेल. यामुळे चळवळीच्या माध्यमातून तरुणानी एकत्रित येऊन आपल्या बापाचा शेती धंदा टिकवण्यासाठी गुलामगिरीविरोधात राज्यात तीव्र लढा ऊभा करावा.

या कायद्यामुळे सध्या पंजाब , उत्तरप्रदेश , उत्तराखंड , हरियाणा येथील शेतकरी जात्यात आहेत यामुळे त्याठिकाणी आंदोलनाची तीव्रता दिसत आहे पण आपणही सुपात आहोत हे विसरू नये. राज्य सरकारनेही लाॅकडाऊनच्या काळातील तीन महिन्याचा घरगुती व शेती पंपाचे वीज बील माफ करण्यासंदर्भात अनेकदा घोषणा केल्या मात्र अमलबजावणी काहींच झाली नाही.यामुळे राज्यातील घरगुती व शेतीपंपाच्या ग्राहकांनी वीज बील भरू नये,अस राजू शेट्टी म्हणाले.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी राज्यात चळवळ मजबूत करण्यासाठी सभासद नोंदणी अभियान राबविण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडून आलेल्या राज्यातील नवनिर्वाचीत सदस्यांचा सत्कार या कार्यकारीणीमध्ये करण्यात आला. या राज्य कार्यकारीणीसाठी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप, प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील , रविकांत तुपकर , प्रा. प्रकाश पोपळे ,अमर कदम, अमोल हिप्परगे यांचेसह राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष , तालुकाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.  स्वागत व प्रास्ताविक उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.