केळी पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन

माणिक लाखे
विषय विशेषज्ञ ( पिक सरंक्षण)
कृषी विज्ञान केंद्र दहीगाव ने

जगातील केळी उत्पादक देशापैकी भारत हा एक प्रमुख केळी उत्पादक देश आहे. भारतात केळीचे उत्पादन हे पहिल्या नंबरवर असून दरवर्षी 7.48 लाख हेक्‍टरवर लागवड होते व त्यातून सुमारे 30 दशलक्ष टन उत्पादन मिळते. केळी पिकावर अनेक रोगाचा प्रादुर्भाव होत असून हा लागवडीपासून ते घड काढणीपर्यंत दिसून येतो.

पनामा किंवा मर रोग : या रोगामुळे पनामा केळीचा संपूर्णपणे नाश झाल्यामुळे त्याला मर (रोग पनामा) रोग म्हणतात. पुणे जिल्ह्यातील सोनकेळीवर हा रोग मोठ्या प्रमाणावर येऊन केळीच्या बागांचे फार मोठे नुकसान झाले आहे. आम्लयुक्त जमिनीत या रोगाचा प्रादुर्भाव अधिक होतो. हा रोग जमिनीतील कवकांमुळे होतो. केळीच्या पिलांना तसेच मोठ्या खुंटांना हा रोग झाल्यामुळे ती मरतात. ग्रोमिशेल ही जात या रोगास जास्त बळी पडत. प्रथम खुंटावरील साल पिवळी पडून सुकते. नंतर केळीची पाने डेरे पिवळी होऊन सुकतात. खुंटाभोवती पाने लोंबतात व नुसते खोड उभे राहते. मुख्य खोड सुकून त्याचा पानांपर्यंतचा भाग चिरलेला दिसतो. रोगट खुंट फळधारणेपूर्वीच मरतो. परंतु केळी निसवल्यानंतर हा रोग पडल्यास केळीची वाढ सारखी होत नसून ती अवेळी पिकतात. रोगट खुंटाच्या खालच्या गड्ड्यात काळ्या रेषा दिसतात. रोगकारक बुरशी मुळांवरील अन्नवाहिन्यांमध्ये वाढते. परिणामी, अन्नरसाचा वरचा मार्ग खुंटतो. अशा खुंटाच्या गड्ड्या लगतच्या पिलांच्या कांद्यातही रोगकारक कवक जाऊन तेथे रोगाचा उपद्रव होतो.

उपाय : ज्या जमिनीत हा रोग झाला असेल अशा जमिनीत केळी लागवड टाळावी. तसेच केळी लागवडीकरता रोगमुक्त अशा बेण्यांचा वापर करावा. या रोगास प्रतिकारक अशा बसराई, हरीसाल यासारख्या जातींची निवड करावी. रोगट बेणे मुळासकट काढून त्याचा नायनाट करावा. जमिनीला पाणी दिल्याने कवकाचा प्रादुर्भाव कमी होतो. बोर्डोमिश्रण 1 टक्के द्रावण प्रत्येक झाडास 5 लिटर याप्रमाणे दिल्यास रोगाचा प्रसार थांबतो. एक-दीड महिन्याने पुन्हा एकदा वरीलप्रमाणे सेरेसान द्यावे.

पर्णगुच्छ (बोकड्या) : गेल्या काही वर्षांपासून या रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर झालेला असून शेकडो एकरांवरील केळीच्या बागा नाश पावल्या आहेत. प्रथमच पानाच्या खालील बाजूवर, मुख्य शिरेवर, देठावर व बारीक शिरेवर अतिशय लहान, अनियमित लांबीचे, गडद हिरव्या रंगाचे लांबट चट्टे दिसतात. ही पाने लहान राहतात. या पानांच्या कडांमधील हरितद्रव्यांचा नाश झालेला आढळून येतो. त्याच्या कडा नागमोडी होऊन पिवळ्या पडतात. पाने ठिसूळ होऊन त्वरित सडतात व वाळतात. पानांचा देठ वाजवीपेक्षा जास्त लांबीचा राहतो. अशा प्रकारच्या पानांमुळे झाडाची वाढ खुंटते. या रोगाचे अखेरच्या अवस्थेतील लक्षण म्हणजे पानांची लांबी व रुंदीकडील बाजूने वाढ कमी होते. पाने तलवारीच्या पात्यासारखी दिसतात. ती ताठ व सरळ उभी राहतात. अशा पानांचा झुबका शेंड्यावर तयार झालेला दिसतो. म्हणूनच या रोगास बंची टॉप असे म्हणतात. यापैकी कोवळ्या पानांमधून सूर्यप्रकाशाकडे पाहिले असता पानांवर गर्द हिरव्या किंवा काळसर रंगाच्या तुटक रेषा स्पष्टपणे दिसतात. रोगट झाडातून सहसा घड बाहेर पडत नाही. पडल्यास केळी लहान आकाराची येतात.

उपाय: मुनवे व गड्डे रोगमुक्त प्रदेशातून आणावे. बोकड्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी बागेतील रोगाट झाडे उपटून त्यांचा नाश करावा. मुनवे व गड्डे यांना बीजप्रक्रिया करून नंतर सात दिवस कडक उन्हात सुकवून लागवड केल्यास पीक या रोगापासून मुक्त राहते.

केळीचा पोंगासड रोग (हार्ट रॉट): या रोगाचा प्रादुर्भाव जळगाव व परभणी जिल्ह्यात हिवाळा व उन्हाळा या दोन्ही ऋतूंत झाल्याचे आढळून आले आहे. झाडाचे मुख्य पान सडणे, पोंगा मर होणे आणि पानांवर पिवळे चट्टे दिसणे असे या रोगाचे बाह्यस्वरूप असते. गाभ्याचा भाग वरून खालपर्यंत कुजलेला आढळतो. कुजण्याची अथवा सडण्याची क्रिया वरच्या भागापासून सुरू होत असून ती गड्ड्यापर्यंत पोहोचून झाडांचा नाश करते. रोगट झाडे सडल्यानंतर त्यांचा उग्र वास येतो. सडण्याची क्रिया फक्त हिवाळ्यात दिसून येते. उन्हाळ्यात मात्र सडण्याची क्रिया आढळून येत नसून फक्त पानांवरच पिवळे चट्टे दिसतात. त्यामुळे उन्हाळ्यात रोगट झाडे चटकन लक्षात येत नाहीत. रोगट झाडापासून रोगट तशीच निरोगी पिलेही येऊ शकतात. या रोगाची लक्षणे पहिल्या प्रथम कोवळ्या पानांवर दिसून येतात. साधारणत: अर्धा इंच रुंदीचे पांढरट अथवा पिवळ्या रंगाचे पट्टे पानांवर आढळतात. हे पट्टे पानांच्या कडांपासून वाढत जातात. पानांच्या वाढीबरोबरच या पट्ट्यांचा रंग तांबूस होत जातो. पानांच्या कडा आतल्या बाजूने गुंडाळल्या जातात. सर्वसाधारणपणे झाडाच्या मधल्या कोवळ्या पानांवर ही लक्षणे स्पष्ट दिसतात.

उपाय: प्रथम रोगट झाडे कापून गोळा करून समूळ नष्ट करावी. या रोगाचा प्रादुर्भाव नसेल अशाच बागेतून बेणे आणावे. ज्या ठिकाणी केळीचा गाभासड ही ज्वलंत समस्य आहे अशा ठिकाणी केळीत असणार्या मावा किडीचा कीटकनाशके फवारून समूळ नाश करावा. परिणामी, या रोगाच्या प्रसाराचा चांगलाच पायबंद बसतो. केळीबागेत काकडीवर्गीय, उदा. काकडी, भोपळा, इ. वगैरे वेलवर्गीय पिके घेऊ नयेत.

फळावरील काळी बोंडी रोग (सिगार अँड रॉट): या रोगास इंग्रजीत जळका चिरूट असे म्हणतात. ह्या रोगाची लागण ट्‍रॅंकिस्पेरा फुक्‍टिजीना आणि व्हर्टीसिलियम थिओब्रोमी या बुरशीमुळे होतो, अगदी अलीकडे जळगाव जिल्ह्यातील केळीच्या कांदाबागेत या रोगाचा नव्यानेच प्रादुर्भाव सुरू झाला आहे. हा रोग फक्त घडांवरील केळांवरच आढळतो. केळीच्या घडामधील काही फळांची खालची टोके प्रथमच काळी पडतात व कुजू लागतात. ही कुजण्याची क्रिया हळूहळू वाढत जाऊन कुजलेला भाग वाळू लागतो. केळीच्या खालच्या टोकाकडून 35 सें.मी.पर्यंतच्या भागावर शुष्क कूज होते. कुजलेल्या भागावर आडव्या, गोलाकार रेषा वलयाप्रमाणे पडलेल्या आढळतात. त्यामुळे अर्धवट पेटलेल्या चिरुटाप्रमाणे केळे झालेले दिसते.

या वाळलेल्या टोकावर रोगकारक कवकाच्या बिजाणूंमुळे करड्या रंगाच्या राखेसारखा थर आढळतो. रोगट फळांचा हिरवा भागही लवकरच लिबलिबीत होऊन कुटल्यामुळे आतील गर उघडा पडून तो गळतो. अशा स्थितीनंतर केळी काळी पडून वाळतात. अशा फळांना बाजारपेठेत काहीच किंमत येत नाही.

उपाय: केळीच्या घडांची तपासणी करून, रोगट फळे काढून त्यांचा नाश करावा. बागेत हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. केळीच्या घडावर ताम्रयुक्त औषधांची फवारणी सप्टेंबर-ऑक्‍टोबर महिन्यात उष्ण व दमट हवामान असताना करावी. 1टक्के तीव्रतेचे बोर्डो मिश्रण तयार करून फळांवर फवारावे. पहिली फवारणी बागेतील केळीचा निसवा 50 ते 60 टक्के झाल्यानंतर करावी. यानंतर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने पुन्हा दोन फवारण्या द्याव्यात. घडावर प्लॅस्टिकच्या पिशव्या बांधाव्या. त्यामुळे फळांच्या सालीवर ओरखडे पडत नाही व फळात बुरशीचा प्रवेश होत नाही. बागेत रोगग्रस्त असलेली फळे व फुले यांचे अवशेष वारंवार काढावे, जेणेकरून बागेत बुरशीचा फैलाव होणार नाही.

बागेत रोगाचा प्रादुर्भाव दिसताच डायथेन एम-45 (0.25 टक्के तीव्रतेचे द्रावण) 75 टक्के घड बाहेर पडल्यावर फवारणी करावी. कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड 50 टक्के 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात घेऊन फवारावे.नंतर सर्व घड बाहेर पडल्यावर बाविस्टीन 0.1 टक्के तीव्रतेचे द्रावण 10 ग्रॅम 10 लिटर पाण्यात 2 ते 3 वेळा 15 दिवसांच्या अंतराने संपूर्ण उघडलेल्या फण्यावर फवारावे.

पानांवरील करपा (लीफ स्पॉट): इंग्रजीत करपा हा रोग सिगाटोका अथवा लीफ स्पॉट या नावाने ओळखतात. केळी पिकावर पडणा-या रोगास या रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनघट आढळून येते. ज्या ज्या ठिकाणी या रोगाची बाधा आढळून आली त्या त्या ठिकाणी आर्थिक नुकसान झाले. या रोगामुळे नुकसान तर झालेच, शिवाय पिकांच्या भांडवली खर्चासही धक्का बसला. लागवडीसाठी वापरात असलेल्या जवळपास सर्व जाती (त्यातल्या त्यात कॅव्हेंडिश समूहातल्या जाती) बळी पडतात. सिगाटोका हा रोग बुरशीजन्य आहे. या बुरशीच्या लैंगिक व अलैंगिक अशा दोन अवस्था आहेत.यापैकी अलैंगिक अवस्थेचे शास्त्रीय नाव सरस्कोस्पोरा म्युसी असून लैंगिक अवस्थेत नाव मायको स्पोरेला म्युसिकोला असे आहे. ही बुरशी दोन प्रकारे बीजाणू तयार करते व हे दोन्ही प्रकारचे बीजाणू रोग प्रादुर्भावासाठी कारणीभूत असतात. लैंगिक अवस्थेतील बीजाणूंना अस्कोस्पोअर्स असे, तर अलैंगिक अवस्थेतल्या बिजाणूंना कोनिडिया असे म्हणतात. मागील 3 ते 4 वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात या रोगामुळे शेतकर्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.

या रोगाच्या प्रमुख दोन जाती आहेत.

1) काळा सिगाटोका : हा रोग मायको स्पेरिला फिजेनसिस या बुरशीमुळे होतो.

2)पिवळा सिगाटोका : हा रोग मायको स्पेरिला म्युसिकोला या बुरशीमुळे होतो. काळा सिगाटोका रोगाचे नियंत्रण करणे पिवळ्या सिगाटोकापेक्षा अत्यंत जिकिरीचे आहे. या रोगाच्या नियंत्रणासाठी वारंवार बुरशीनाशकाची फवारणी करावी लागते. त्यामुळे उत्पादनखर्चात वाढ होते. पर्जन्यमानात झालेली वाढ, सतत पडणारा पाऊस, हवेतील सापेक्ष आर्द्रता वाढल्याने तसेच जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्यास, केळीची पाने सतत ओली राहिल्यास रोगाचा प्रसार झपाट्याने होण्यास मदत होते. सिगाटोका रोगाचा प्रसार हवेद्वारे लैंगिक बीजाणूंमुळे प्रथम होतो. नंतर पावसाचे थेंब व सोसाट्याचा वारा यांद्वारे लैंगिक बीजाणू रोगाच्या दुय्यम प्रसारात कारणीभूत होतात. तसेच अतिशय दमट हवामानामध्ये रोगट पानांवरील दवबिंदूंमध्ये बीजाणू मिसळल्यानंतर हे दवबिंदू निरोगी पानांवर पडल्यानंतर या रोगाच्या बुरशीच्या वाढीसाठी, बीजाणूंचे अंकुरण होण्यासाठी, उष्ण व दमट हवामान, सतत पडणारा रिमझिम पाऊस, दीर्घकाळ ढगाळ वातावरण, 23 ते 25 डिग्री तापमान या गोष्टी अनुकूल आहेत. या रोगाची लैंगिक अवस्था जमिनीत व जुन्या बागांच्या अवशेषांमध्ये पोसली जाते. केनिडिया या अवस्थेची निर्मिती पिकावर होते व त्याचा हवेद्वारे प्रसार होतो. 21 अंश से. पेक्षा कमी तापमानात व कोरड्या हवामानाला या रोगाचा प्रसार होत नाही.या रोगाची लक्षणे मुख्यत: पानांवरच दिसतात. पानांवर प्रथम फिकट पिवळ्या रंगाचे ठिपके दिसून येतात. हे ठिपके वाढत जाऊन लांबट पिवळ्या रेषा एकमेकांत मिसळून मोठ्या आकाराचे राखट रंगाचे ठिपके तयार होतात. अशा प्रकारचे ठिपके पानांच्या सर्व भागांवर पसरले जाऊन सबंध पान वाळलेले दिसते. या रोगाची लक्षणे जमिनीलगतच्या जुन्या 3 ते 4 पानांवर जास्त दिसते व त्यामानाने वरची पाने निरोगी दिसतात. पाने अकाली पिवळी पडून देठाशी मुडून लटकलेली दिसतात. झाडावरील कार्यक्षम पानांची संख्या कमी होऊन अन्न तयार करण्याच्या कामात बाधा येऊन झाडाची वाढ खुंटते. परंतु झाड मरत नाही.

प्रतिबंधात्मक उपाय
* शिफारशीत अंतरावरच लागवड करावी.
* बागेत पाणी साठू देऊ नये. पाण्याचा योग्य निचरा करावा.
* पाणीव्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा.
* बाग व भोवतालचा परिसर तणमुक्त ठेवावा.
* बागेतील पिले व पत्ती वेळच्या वेळी कापून त्याची बागेबाहेर योग्य विल्हेवाट लावावी.
* बागेस शिफारशीप्रमाणेच खत मात्रा द्याव्यात.
* पानाचा रोगग्रस्त भाग अथवा संपूर्ण पान कापून नष्ट करावे.
* बागेत रोगाची लक्षणे दिसल्यास 500 ग्रॅम कार्बेन्डॅझिम किंवा 1250 ग्रॅम कॉपर ऑक्‍सि क्‍लोलराईड किंवा 1250 ग्रॅम मॅन्कोझेब किंवा 500 मि.लि. प्रॉपीकोनॅझोल यांपैकी एका बुरशीनाशकाची 500 मि.लि. स्टीकरसहित 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी. रोगाच्या तीव्रतेनुसार 10 ते 15 दिवसांच्या अंतराने वरीलपैकी एका बुरशीनाशकाच्या दोन ते तीन फवारण्या कराव्यात.

मोझाइक किंवा हरितलोप रोग (क्‍लोरोसिस): या रोगाची लागण महाराष्ट्रात ठाणे, नाशिक, जळगाव, पुणे व धुळे जिल्ह्यात आढळून आलेली आहे. हा रोग गुजरातमधील सुरतमध्ये आढळून आलेला आहे. या रोगाची रोगट लागण झाल्यास पानावर हरितद्रव्य दिसत नाही व पिवळसर पट्टे सर्वत्र विखुरलेले दिसतात. अशी रोगट झालेल्या झाडांची वाढ खुंटते. ही झाडे पूर्णपणे वाढत नाहीत. वाढल्यास त्यांना क्वचित प्रमाणात घड लागतात. वाढीच्या सर्व अवस्थांत केळीच्या झाडाला या रोगाची बाधा होते. या रोगाची लागण एका झाडापासून दुसर्या झाडांना व बागेत घेतलेल्या आंतरपिकातही होते.

उपाय: मुनवे व गड्डे रोगमुक्त प्रदेशातून आणावे मेलेली झाडे उपटून नंतर त्यांचा नाश करावा. गड्डे बुरशीनाशकाच्या द्रावणात 90 मिनिटे बुडविल्यास व नंतर सात दिवस कडक उन्हात सुकवून लागवड केल्यास पीक या रोगापासून मुक्त राहते.

मुकुटसड (क्राऊन रॉट): या रोगाची लागण ही ज्या वेळी केळी फळाची फणी घडापासून वेगळी करताना जी जखम होते, तेव्हा तिथून विविध प्रकारच्या बुरशी फळांच्या देठांतून आत प्रवेश करतात. ह्या रोगट बुरशी बागेत पानांच्या कचर्यात व फुलावर आढळतात. बहुतेक ही बुरशी मुकुटाच्या पृष्ठभागाजवळ दिसते. मुकुटाच्या बुरशीच्या जिवाणूंचा प्रसार वार्यामार्फत किंवा पावसाच्या पाण्यामार्फत होतो. या रोगाची लागण झालेल्या केळीच्या देठाकडील भागावर पांढर्या करड्या किंवा गुलाबी रंगाची बुरशीची वाढ दिसते. पुढे हा भाग काळा पडून कुजू लागतो. तसेच घड काढताना तोडलेल्या घडाच्या उघड्या भागातून या बुरशीचा शिरकाव केळीत होतो.

नियंत्रण: या रोगाची लागण ज्या बागेत झाली असेल ती बाग स्वच्छ ठेवावी.
केळी फळांचे पॅकिंग करताना नेहमी स्वच्छ ठिकाणी करावे.
केळी घडाची काढणी करताना धारदार शस्त्र वापरावे व काढणी केल्यानंतर घडावर आंतरप्रवाही बुरशीनाशकाची फवारणी करावी.
काढणी केल्यावर घड लगेच थंड करून घ्यावेत.
तुलनात्मकदृष्ट्‌या केळी पिकावर किडीचा फारसा प्रादुर्भाव होत नाही; परंतु काही वेळेस मावा, केळीवरील सोंडकीड, खोडकीड, सूत्रकृमी इ. किडींचा उपद्रव केळीबागेत आढळतो. या किडीच्या नियंत्रणासाठी योग्य त्या कीटकनाशकाची 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या द्याव्यात.

जिवाणूजन्यरोग:खोडसड/रायझोमरॉट
हा रोग इर्विनिया’ नावाच्या जिवाणूमुळे होतो. यामुळे याला इर्विनिया रॉट असेही म्हणतात. या रोगाचा प्रसार रोगग्रस्त कंद आणि मातीद्वारे होतो.या रोगाची लक्षणे लागवडीनंतर साधारणतः दोन ते तीन महिन्यांनी दिसू लागतात. यामध्ये रोगग्रस्त झाडावरील खालची पाने मलूल होऊन ती अचानकपणे झुकू लागतात. रोगग्रस्त झाड जमिनीलगत सडण्यास सुरवात होते व त्या ठिकाणी गडद तांबडे किंवा पिवळे पाणथळ फुगवटे दिसून येतात. सडण्याची ही क्रिया कालांतराने वरील पाने व शेंड्याकडील वाढीच्या भागापर्यंत होते. जिवाणू संसर्गामुळे कंद हळूहळू कुजतात, मुळ्यांची संख्या कमी होते. मुळ्यांवरही वरीलप्रमाणे जखमा दिसून येतात व मुळ्यांची टोके वाळतात. अशी रोगग्रस्त झाडे जमिनीलगत कुजून हलक्‍यास धक्‍याल वाने अथवा वाऱ्याने कोलमडून पडतात. मात्र कंद व मुळ्या जमिनीतच राहतात.

नियंत्रणाचे उपाय प्रगतशील शेतकरी
लागवड अतिवृष्टी अथवा पाणी साचणाऱ्या ठिकाणी करू नये.
लागवडीसाठी रोगमुक्त बागेतूनच जोमदार व चांगल्या प्रतीचे कंद निवडावेत.
प्रत्येक झाडास 600 ग्रॅम कॉपर ऑक्‍स्क्‍लोडराईड +30 ग्रॅम स्ट्‍रेप्टोमायसीन + 600 मि.लि. क्‍लोलरपायरीफॉस यांचे 200 लिटर पाण्यात द्रावण तयार करून प्रत्येक झाडास 100 ते 200 मि.लि. सिंचन करावे.

बनानास्ट्‍रीकव्हायरस
भारतामध्ये अलीकडील काळात आढळून आलेल्या या रोगाचा प्राथमिक प्रसार प्रादुर्भावित कंदांमार्फत, तर दुय्यम प्रसार मोसंबी व उसावरील पिठ्या ढेकणामार्फत होतो. या रोगामध्ये केळीच्या पानावर सुरवातीला हरितद्रव्यरहित, पिवळसर सोनेरी रंगाच्या खंडित अथवा सलग रेषा दिसून येतात. कालांतराने तेथील उतींचा ऱ्हास होऊन या उती मृत होतात व या रेषा काळ्या पडतात. पानांव्यतिरिक्त देठावर, पानाच्या मागील बाजूस मध्य शिरेवर, पोग्यातील पानावर तसेच खोडावरसुद्धा वरीलप्रमाणे रेषा दिसून येतात. परिणामी पाने ठिसूळ बनून पानांची आतील बाजूस गुंडाळी होते, पानांच्या शिरा जाड होऊन झाडाची वाढ खुंटते, घडाचा दांडा कोरडा पडल्याने विकृत स्वरूपाचा घड तयार होतो.
पोगासड/ इन्फेक्‍शिचअस क्‍लोऊरोसीसची लक्षणे दाखवणारा क्‍युदक्‍युंडबर मोझॅक व्हायरस
महाराष्ट्रात 1943मध्ये सर्वप्रथम जळगाव जिल्ह्यामध्ये हा विषाणूजन्य रोग आढळून आला. या रोगाचा प्राथमिक प्रसार कंदांमार्फत, तसेच बाधित कंदांपासून तयार केलेल्या उतिसंवर्धित रोपांपासून होतो. दुय्यम प्रसार मावा किडीमार्फत होतो. मुख्य/ पोग्यातील पानाचे सडणे, पोगा मरणे, कालांतराने अंतर्गत खोडातील पेशी मृत होणे ही या रोगाची प्रमुख लक्षणे आहेत. या रोगाची प्राथमिक लक्षणे कोवळ्या पानावर आढळतात.

विषाणूजन्यरोगांचाप्रतिबंध
विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण करणे अवघड असल्याने त्यांचा प्रसार रोखणे, तसेच त्यांच्यापासून होणाऱ्या नुकसानीची पातळी नियंत्रणात राहील याबाबत प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्‍याक आहे.

* लागवडीसाठी रोगमुक्त, जोमदार व सशक्त कंद निवडावेत.
* रोपे खात्रीशीर नर्सरीतूनच घ्यावीत.
* विषाणूजन्य रोगाची लागण झालेली झाडे उपटून समूळ नष्ट करावीत. यामुळे या रोगाचा प्रसार नियंत्रित करता येतो.
* या रोगांचा प्रसार शोषणाऱ्या किडींमार्फतच होत असल्याने आंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करून या किडींचा प्रभावीपणे बंदोबस्त करावा.
* केळी पिकामध्ये, तसेच आजूबाजूला काकडी व इतर वेलवर्गीय पिकांची लागवड करू नये.
* मोठ्या प्रमाणात ऊस लागवड असलेल्या भागात केळी लागवड टाळावी.
* विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण अवघड असल्याने ते होऊ नयेत म्हणूनच योग्य ती दक्षता घेणे अत्यंत गरजेचे आहे.
* रोगांच्या लक्षणांचे योग्य निरीक्षण करून रोग ओळखावा आणि मगच त्याच्या नियंत्रणाचे उपाय तज्ज्ञांच्या सल्ल्‌याने करावेत.
* रोगांचे वहन करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या कीटकांचे प्रमाण नियंत्रणात ठेवावे.
* लागवडीचे अंतर, योग्य खतमात्रा, पाण्याचे नियोजन, तणनियंत्रण आणि एकंदरीतच बागेचे व्यवस्थापन या गोष्टी रोगनियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.

केळी पिकावर बुरशीजन्य, जिवाणूजन्य तसेच विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. जिवाणूजन्य खोडसड रोगाची लक्षणे लागवडीनंतर दोन ते तीन महिन्यांनी दिसू लागतात. बुरशीजन्य करपा रोगामुळे तर केळीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगांचा प्रादुर्भाव ओळखून वेळीच त्यावर उपाययोजना करणे आवश्‍येक असते.
तज्ज्ञांनी सुचविल्याप्रमाणे नियंत्रणाचे उपाय स्वजबाबदारीवर करावेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.