मुलाखतीशिवाय शिक्षक भरतीस संस्थांचा “हो’

“पवित्र’ पोर्टल : राज्यभरातील 14 संस्था सकारात्मक; 1,241 शिक्षकांची केली जाईल नियुक्‍ती

न्यायालयाच्या निकालानंतरच संधी

पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीच्या विरोधात उच्च न्यायालयात काही उमेदवारांनीच याचिका दाखल केलेल्या आहेत. यामुळे भरतीची प्रक्रिया पुढे सरकण्यात मोठा अडथळा निर्माण झालेला आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यासाठी 20 टक्के राखीव जागा ठेवाव्यात, बीएड अर्हता धारक उमेदवारांना ब्रिज कोर्स करण्याची अट या विषयांवर याचिका दाखल आहेत. यावर उच्च न्यायालयाचे अंतरिम आदेश झाले आहेत. परंतू अंतिम आदेशानंतरच त्याची स्पष्टता समोर येणार आहे. न्यायालयाच्या निकालानंतरच उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी संगणकीय प्रणाली खुली करण्यात येणार आहे.

पुणे – पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी राज्यातील 14 खासगी शैक्षणिक संस्थांनी मुलाखतीशिवाय 1 हजार 241 शिक्षकांची गुणवत्तेनुसार निवड करण्यासाठी होकार दर्शविला आहे. यामुळे मुलाखत प्रक्रियेतून उमेदवारांची सुटका होण्यातील मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य शासनाने पारदर्शकपणे शिक्षकभरतीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलवर 1 लाख 23 हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळांनी 12 हजार शिक्षकांची भरती करण्यासाठी पोर्टलवर जाहिरातीही प्रसिध्द केल्या आहेत. आता उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रमा नोंदविण्यासाठी स्वतंत्र संगणक प्रणालीही तयार करण्यात आली आहे.

या प्रणालीद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार, पात्रतेनुसार निवडक शाळांची यादी पोर्टलवर पाहता येणार आहे. या यादीतील पाहिजे तेवढे प्राधान्यक्रम उमेदवारांना नोंदविण्यासाटी मुभा देण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शाळांसाठी मेरीटनुसार थेट शिक्षकांची निवड व नियुक्‍त्या केल्या जाणार आहेत. मात्र खासगी शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन शिक्षकांच्या निवडी करण्याचे अधिकार देण्याचा हट्ट धरला होता. तो शासनाने मान्यही केला आहे. एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीला बोलाविण्याची नियमावलीही तयार करण्यात आली. मुलाखत व वर्गात शिकविण्याच्या प्रक्रियेचे व्हिडीओ शुटींग करण्याची अटही घालण्यात आली आहे.

मुलाखत घेण्याची प्रक्रिया ही वेळखाऊ आहे. तसेच मुलाखत निवडीवरुन पुन्हा शंकाही उपस्थित केली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी खासगी शैक्षणिक संस्थांकडे मुलाखतीशिवाय उमेदवार निवडी करण्याबाबत विनंती केली होती. संस्थानी ती विनंती मान्य करुन प्रतिसाद देण्याची तयारी दर्शविली आहे.
सुमारे 10 हजार उमेदवारांनी पवित्र पोर्टलच्या मदत कक्षात प्रोफाईल अपडेट करण्यासाठी अर्ज भरले आहेत. उमेदवारांनी अर्ज स्वप्रमाणित करुन घेणे आवश्‍यक आहे अन्यथा उमेदवारांना प्राधान्य क्रम भरता येणार नाहीत. उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी मार्गदर्शक व्हिडीओ पुढील आठवड्यात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.