नवी दिल्ली – करोनाच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्याची क्षमता अधिक वाढवण्याच्या हेतूने व्हेंटिलेटरचे उत्पादन करण्याचे सूचना केंद्र सरकारने ऍटोमोबाईल उत्पादकांना केली आहे. याबरोबरच संरक्षण, संशोधन आणि विकास संस्था अर्थात “डीआरडीओ’देखील पुढील आठवड्यापासून दर दिवसाला 20 हजार “एन-95′ वैद्यकीय मास्क तयार करणार आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
करोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभुमीवर देशभरात सध्या 14 हजार रुग्णांसाठी व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. तर 11.95 लाख “एन-95′ मास्क उपलब्ध आहेत. गेल्या दोन दिवसात अतिरिक्त 5 लाख मास्क वितरीत करण्यात आले आहेत आणि आज (सोमवारी) आणखी 1.40 लाख मास्क वितरीत करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुग्णालयांमध्ये एकूण 3.34 लाख पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट उपलब्ध आहेत आणि आणखी 3 लाख “पीपीई’ परदेशातून देणगी स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ही “पीपीई’4 एप्रिल रोजी उपलब्ध होणार आहेत.
ऑटोमोबाईल उत्पादकांना व्हेंटिलेटर तयार करण्यास सांगितले गेले आहे, असे आरोग्य मंत्रालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे.