वाई -पावसाळ्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी पूर्वतयारी करून सर्व प्रशासकीय विभागांनी सज्ज राहवे, अशा सूचना प्रांताधिकारी संगीता चौगुले यांनी दिल्या. वाई तालुक्यात यंदाही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता गृहीत धरून पावसाळ्यात येणाऱ्या अडचणींचा सामना व समस्यांची पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने प्रांताधिकारी संगीता चौगुले यांच्या उपस्थितीत वाई पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, महसूल, वीज वितरण विभाग, वाई आगार व वाई नगरपालिकेतील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी तहसीलदार रणजीत भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, उपअभियंता श्रीपाद जाधव व संजय जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप यादव, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक राजेंद्र शेडगे, वीज वितरण उपअभियंता अविनाश खुस्पे, कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ व वाई आगारातील नाळे यांची उपस्थिती होती.
वाई तालुक्यात अतिवृष्टीमुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्याची खबरदारी घेण्यासाठी प्रत्येक विभागाला सूचना देण्यात आल्या. शहरासह ग्रामीण भागातील धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारती व घरातील रहिवाशांना योग्य सूचना देऊन डागडुजी अथवा पर्यायी व्यवस्थेचे उपाय करावेत, शहरातील नाले- गटारांची सफाई वेळेत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावर येणारी धोकादायक झाडे व फांद्या हटवण्याचे काम तात्काळ सुरू करावे, वीज वितरण कंपनीने विद्युत वहिनी तारांचे अडथळे दूर होतील, अशी यंत्रणा कार्यान्वित करावी, वाई आगाराने डेपोतील नादुरुस्त बसेसची दुरुस्ती करून घ्यावी, आरोग्य विभागाने पावसाळ्यातील साथीचे रोग व अन्य दुर्घटनांचे प्रमाण लक्षात घेता औषधांचा मुबलक साठा व प्राथमिक उपचाराची तयारी ठेवावी, अशा सूचना करण्यात आल्या. केलेल्या पूर्वतयारीचे आलेख 25 मे पर्यंत वाई महसूल आपत्कालीन प्रशासनाकडे माहितीसाठी सुपुर्द करण्याचे आदेश देण्यात आले.