पुणे – कुशल मनुष्यबळ विकसित करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रशिक्षणार्थी तथा इंटर्नशिप एम्बेडेड पदवी कार्यक्रम सुरू करण्याचे निर्देश उच्च शिक्षण संस्थांना दिले आहेत. त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना “यूजीसी’ने जारी केल्या आहेत.
व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचे प्रात्यक्षिक ज्ञान विद्यार्थ्यांना प्राप्त होत नाही. त्यामुळे प्रात्यक्षिकासाठी इंटर्नशिप महत्त्वाची आहे. त्यासाठी शिक्षणार्थी तथा इंटर्नशिप एम्बेडेड पदवी कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे इंटर्नशिपचा हा कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर उद्योगांना मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याचे यूजीसीचे म्हणणे आहे.
या कार्यक्रमांतर्गत पदवीच्या एकूण श्रेयकांपैकी कमीत कमी 20 टक्के प्रशिक्षणार्थी अथवा इंटर्नशिपसाठी देण्यात याव्यात, असे नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. त्यानुसार एखाद्या विद्यार्थ्याला पदवी अभ्यासक्रमासाठी 132 क्रेडिट्स प्राप्त करावे लागतील. हा सर्व कार्यक्रम चाईस बेस्ड क्रेडिट सिस्टिमवर आधारित राहील.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या अथवा इंटर्नशिपसाठी शैक्षणिक क्रेडिट देण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांना स्वत:ची यंत्रणा कार्यान्वित करावी लागेल. या कार्यक्रमानुसार 2030 मध्ये भारतामध्ये सर्वात जास्त कार्यरत वयांची लोकसंख्या असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता सुधारण्यासाठी नवीन दृष्टीकोन आवश्यक आहे. उच्च शिक्षणास उद्योग आणि कार्याच्या जगाशी जोडण्यासाठी हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका निभावेल, अशी आशा आहे.
– डी.पी.सिंह, यूजीसीचे अध्यक्ष