“मुख्यमंत्र्यांनी घरात बसून सोशल मीडियावर शब्दांची फेकाफेक करण्यापेक्षा…”

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची राज्य सरकारवर टीका

मुंबई : गणेशोत्सवात बाजारपेठांमध्ये उसळलेली गर्दी, लॉक डाऊन शिथिलीकरणाबरोबर मास्कचा वापर आणि सोशल डिस्टसिंगबाबत सुटलेले भान यामुळे सप्टेंबरमध्ये जवळपास १० टक्क्यांनी करोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे बाधितांचे प्रमाण १७ ते २० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. यावरून आता भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

“मुंबईतील करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून रुग्णवाढीचा वेग चिंताजनक झाला आहे. राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेने वारंवार नियमात केलेले बदल, अंमलबजावणीतील शिथिलता, रुग्ण संख्या लपवण्यासाठी कमी केलेल्या चाचण्या आणि घरी बसून चालवलेला कारभार याचा हा परिणाम आहे,” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला आहे.

ऑगस्टमध्ये मुंबईत प्रतिदिन रुग्णसंख्या सर्वसाधारणपणे एक हजार किंवा त्याहून कमी नोंदली जात होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात दर दिवशी सुमारे सात ते नऊ हजार चाचण्या होत होत्या आणि बाधितांचे प्रमाण सुमारे १० ते १२ टक्के होते. पुढील आठवडय़ात हे प्रमाण जवळपास १५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात चाचण्यांची संख्या आठ ते नऊ हजार झाली आणि बाधितांचे प्रमाण २२ टक्क्यांपर्यंत पोहोचले.

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात पालिकेने दर दिवशी चाचण्यांची संख्या सुमारे १५ हजारांवर नेली. त्या तुलनेत दर दिवशीची रुग्णसंख्याही जवळपास अडीच हजारांहूनही अधिक नोंदली गेली. दर दिवशी चाचण्यांची संख्या दहा हजारांहून अधिक केल्याने रुग्णसंख्या वाढल्याचा दावा पालिकेने केला तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण १७ ते २० टक्क्यांवर गेल्याचे आकडेवारीतून दिसून येते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.