-->

पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा…;भाजपच्या ‘या’ नेत्याची शरद पवारांवर टीका

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनंतर सध्या पक्ष विरोधकांच्या रडारवर आला आहे. आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवारांची भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. दरम्यान, पक्षाकडून धनंजय मुंडे यांना दिलासा देण्यात आला असून तूर्तास तरी राजीनामा घेण्यात येणार नसल्याचे म्हटले गेले आहे. यादरम्यान शरद पवारांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतल्याच्या वृत्तावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

अतुल भातळखकर यांनी ट्विट करत शरद पवारांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. “पोलीस अधिकाऱ्यांनी शरद पवारांसोबत चर्चा करायला ते राज्याचे गृहमंत्री आहेत की मुख्यमंत्री? राज्यात कोणतेही अधिकार पद नसलेल्या पवारांशी चर्चा करणाऱ्या या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी मी कॅबिनेट सचिवांकडे करणार आहे,” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

“पाठीमागून सूत्र हलवण्यापेक्षा घरी बसलेल्या मुख्यमंत्र्यांना नारळ देऊन शरद पवारांनी सत्तेची सूत्रे हाती घ्यावी,” असा उपहासात्मक सल्लाही अतुल भातखळकर यांनी दिला आहे.

या दरम्यान मुंडे यांच्यावर आरोपाला नवी कलाटणी मिळाली असून भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केली. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप केला आहे. या दोन राजकीय नेत्यांशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.