झांसापत्राऐवजी भाजपने माफीनामा जारी करायला हवा होता – कॉंग्रेस

न पाळलेल्या आश्‍वासनांबद्दल विचारले 125 प्रश्‍न
नवी दिल्ली – मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाबद्दल भाजपकडे दाखवण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे भाजपने जाहीरनाम्याऐवजी माफीनामा जारी करायला हवा होता. त्या पक्षाचा जाहीरनामा (संकल्पपत्र) म्हणजे झांसापत्र आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसकडून सोडण्यात आले.

भाजपच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवताना कॉंग्रेसने त्या पक्षावर जोरदार शाब्दिक तोफ डागली. भाजपने 2014 मधील जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता न केल्यावरून कॉंग्रेसने 125 प्रश्‍नांची यादीच पुढे केली. रोजगार, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 50 टक्के वाढ, काळा पैसा परत आणणे, महागाई आणि भ्रष्टाचाराला लगाम आदी आश्‍वासनांचे पालन करण्यात भाजपला यश आले नसल्याचा आरोप कॉंग्रेसने केला. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी भाजपच्या जाहीरनाम्याची चिरफाड करताना आमच्या जाहीरनाम्यावर जनतेचे तर भाजपच्या जाहीरनाम्यावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असल्याकडे लक्ष वेधले.

तर कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी जुमला ते झांसा (फसवणूक) असा मोदींचा प्रवास आपण पाहिल्याची टिप्पणी केली. आज देशाची 125 कोटी जनता मोदींनी दिलेल्या 125 आश्‍वासनांबद्दल उत्तर मागत आहे. जनता मोदींच्या झांसापत्राचा स्वीकार करणार नाही. आता त्यांनी स्वत:ची बॅग भरून जाण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. मोदी राजवटीत देशावरील कर्ज 54 लाख कोटींवरून 82 लाख कोटी रूपयांपर्यंत पोहचले. मोदींनी देशावरील कर्जात दरदिवशी 1 हजार 500 कोटींची तर दरमहा 45 हजार कोटींची भर घातली, असा आरोपही त्यांनी केला. एकंदर, भाजपच्या जाहीरनाम्याचे वर्णन कॉंग्रेसकडून खोट्या बाबींनी भरलेला फुगा अशा शब्दांत करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.