होम आयसोलेशनऐवजी ‘ती’ महिला थेट पोहचली दुबईला

दुबई दुतावासाला कळविणार : ‘त्या’ करोनाबाधित महिलेवर गुन्हा दाखल

पिंपरी – करोना बाधित असतानाही एका महिलेने पुनावळे ते दुबई असा प्रवास केला. या प्रकरणाची माहिती मिळताच त्या महिलेच्या विरोधात सोमवारी (दि. 21) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या गुन्ह्याची माहिती पोलीस दुबईच्या भारतातील दुतावासास देणार आहेत.

डॉ. अमित आबासाहेब माने (वय 33, रा. पुनावळे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वंदना मोनिल ठक्‍कर (वय 30) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने पुनावळ्यातील व्हिजन इंद्रमेघ या सोसायटीमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. फ्लॅटच्या खरेदीची कागदोपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ती लॉकडाऊन पूर्वी दुबईमधून पुनावळे येथे आली होती. दरम्यानच्या काळात भारतात करोनामुळे लॉकडाउन झाले. परदेशातील विमानसेवा बंद झाली. यामुळे महिला पिंपरी चिंचवड शहरातच अडकून राहिली.

दरम्यान 11 जुलै रोजी महिलेने थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात करोनाची तपासणी केली. त्यात ती महिला करोना बाधित असल्याचे निदान झाले. संबंधित रुग्णालयाने महापालिका प्रशासनाला 12 जुलै रोजी माहिती दिली. त्या महिलेने होम आयसोलेशनचा पर्याय निवडला आणि तिच्या फ्लॅटमध्ये राहण्याची तिने तयारी दर्शविली. 13 जुलै रोजी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या पथकाने होम आयसोलेशनची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, प्रशासनाने महिला राहत असलेल्या सोसायटीला कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केले. जबाबदारी म्हणून सोसायटीच्या अध्यक्षांनी होम आयसोलेशनच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. सोसायटी कार्यालयातील एक कर्मचारी देखील महिलेच्या सेवेसाठी देण्यात आला.

17 जुलैला त्या महिलेने “मी औषधे घेऊन येते,’ असे सांगून बाहेर गेली. महिला तिच्या फ्लॅटमध्ये नसल्याची माहिती सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. सोसायटी पदाधिकाऱ्यांनी सोसायटीच्या गेटवरील नोंदवही तपासली असता त्यात महिलेने सगळी माहिती खोटी दिल्याचे दिसूने आले. सर्वजण महिलेला शोधत असताना सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या मोबाइलवर त्या महिलेचा मेसेज आला. “मी दुबईतील शारजा येथे पोचले आहे. माझी करोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.’ यामुळे सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी हिंजवडी पोलीस आणि महापालिका प्रशासनाला याबाबत माहीत दिल्याचे सोसायटी अध्यक्ष आशिष बिरादार यांनी सांगितले. गुन्हा दाखल झालेल्या करोना बाधित महिलेची माहिती दुबई येथील दुतावासास कळविण्यात येणार आहे. तसेच त्या महिलेलाही याबाबत फोनद्वारे कळविण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.